> निरोप समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे गौरवोद्गार
पंतप्रधान मोदींची ऊर्जा अनुकरणीय आहे. त्यांच्या चांगल्या आठवणी घेऊन जात आहे. राजकारणात जी वाटचाल केली आणि माझी जी काही जडणघडण झाली त्यामध्ये संसदेचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉल सभागृहात आयोजित निरोप समारंभात बोलताना केले.
यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जींना स्मृतिचिन्ह तसेच संसद सदस्यांच्या स्वाक्षरीचे कॉफी टेबल बुक व निरोपाचे भाषण भेट म्हणून दिले. निरोपाचे भाषण करताना प्रणव मुखर्जी यांच्या डोळ्यात तरल भाव साठले होते. लोकशाहीच्या मंदिरात (संसदेत) माझ्या विचारांना पैलू पडले. मी या संसदेची निर्मिती आहे असे म्हटले तर चुकीचे वाटायला नको. २२ जुलै १९६१ हा माझा संसदेतला पहिला दिवस होता. निरोपाचे भाषण करताना मला संसदेतला पहिला दिवस आठवतो आहे. राष्ट्रपती म्हणून सभागृहाचा निरोप घेतो आहे हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय आहे, असे प्रणव मुखर्जी म्हणाले.
या दिमाखदार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्याच पक्षाचे खासदार व दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात वरिष्ठ नेते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह अरुण जेटली, गुलाम नबी आझाद, लालकृष्ण अडवाणी यांचा समावेश होता. रामनाथ कोविंद २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ आज २४ जुलै रोजी संपत आहे.