>> पशुसंवर्धन खात्याचा पुढाकार; मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती; अपघात टळणार
मोकाट गुरांमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी पशुसंवर्धन खात्याने या गुरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे घालण्याची योजना सुरू केली असून, या योजनेला ‘गोरक्षा सूत्र’ असे नाव दिल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.
मोकाट गुरांच्या सुरक्षेसाठी आखलेल्या या योजनेचे नामकरण ‘गोरक्षा सूत्र’ असे करण्यात आले असून, रेडियमचे हे पट्टे पुरवण्याची जबाबदारी पणजी रोटरॅक्ट क्लबने घेतली आहे. त्यानुसार हा क्लब रेडियमचे ५ हजार पट्टे गुरांच्या गळ्यात घालण्यासाठी पशुसंवर्धन खात्याला देणार असल्याचे हळर्णकर यांनी सांगितले.
हे रेडियमचे पट्टे मोकाट गुरांच्या गळ्यता बांधले जाणार आहेत. रात्रीच्या वेळी वाहनांचा प्रकाश पडल्यानंतर हे पट्टे चकाकणार असल्याने मोकाट गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असल्यास ती वाहनचालकांच्या निदर्शनास येणार आहेत. त्यामुळे वाहनचालक सावध होतील आणि रस्त्यावर मोकाट गुरांचे होणारे जीवघेणे आणि भीषण अपघात टाळले जातील, असा विश्वास हळर्णकर यांनी व्यक्त केला.
कालांतराने राज्यातील सर्वच मोकाट गुरांच्या गळ्यात हे पट्टे घालण्यात येतील. रात्री-अपरात्री अंधारात महामार्गांबरोबरच अंतर्गत भागांतील रस्त्यांवर देखील मोकाट गुरे ठाण मांडून बसत असतात व ती निदर्शनास येत नसल्याने वाहनचालकांना, विशेषत: दुचाकीचालकांना अपघात घडत असतात. काही वाहनचालक अशा अपघातात सापडून ठारही होत असतात. तसेच काही वेळी या मुक्या प्राण्यांना देखील प्राणाला मुकावे लागते. रेडियमच्या या पट्ट्यांमुळे अशा प्रकारच्या अपघातांना ‘ब्रेक’ लागणार असल्याचे हळर्णकर म्हणाले.