मोकळे आकाश धोरणाची ‘सेकंड इनिंग’ यशस्वी होईल?

0
143

– शशांक मो. गुळगुळे
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे विमान प्रवास करणार्‍यांची संख्या फार कमी होती. टाटा उद्योग समूहाची प्रवासी विमान वाहतूक कंपनी होती. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे उद्योग हे शासनानेच चालवावेत असे आपले धोरण होते. परिणामी टाटा उद्योग समूहाची प्रवासी विमान वाहतूक कंपनी शासनाने आपल्या पंखाखाली घेऊन तिचे दोन कंपन्यांत रूपांतर केले. यापैकी एअर इंडिया या कंपनीची विमाने परदेशात जात व इंडियन एअरलाईन्स या कंपनीची विमाने देशांतर्गत सेवा देत. भारताने ‘खाजाऊ’ (खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण) धोरण स्वीकारेपर्यंत म्हणजे १९९१-९२ पर्यंत या दोन सरकारी कंपन्यांची मक्तेदारी होती. ‘खाजाऊ’ धोरणाचा एक भाग म्हणून भारत सरकारने (ओपन स्काय पॉलिसी) मोकळे आकाश धोरण अमलात आणले. हे धोरण अमलात आणल्यानंतर पाच ते सहा खाजगी प्रवासी विमान वाहतूक कंपन्या भारतात सुरू झाल्या व यांपैकी एक ‘जेट एअरवेज’ ही कंपनी सोडली तर इतर सर्व कंपन्या अयशस्वी ठरून अल्पावधीत बंद पडल्या. मोकळे आकाश धोरणाची पहिली ‘इनिंग’ अयशस्वी ठरली!
पहिल्या इनिंगमध्ये ‘मोदीलुफ्त’ ही कंपनी अस्तित्वात आली होती. मोदी उद्योग समूह व आंतरराष्ट्रीय पातळीवरची ‘लुफतान्झा’ या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन ही कंपनी भारतात सुरू केली होती. पण ती अल्पजीवी ठरली. वरवेझ दमानिया व जहांगिर दमानिया हे दोघे भाऊ प्रवर्तक असलेली ‘दमानिया एअरवेज’ ही कंपनी सुरू करण्यात आली होती. ही कंपनीही तग धरू शकली नाही. काही महिन्यांतच ती बंद पडली. दमानिया उद्योग समूहाने मुंबई-गोवा कॅटेमरान सागरी प्रवासी वाहतूक सेवाही सुरू केली होती, तीदेखील काही महिन्यांतच बंद पडली. त्या काळात तिसरी अस्तित्वात आलेली कंपनी म्हणजे ‘एनईपीसी.’ चेन्नई येथील खेमका या कंपनीचे प्रवर्तक होते. राज्यातील जिल्हा ते जिल्हा जोडणे (उदाहरणार्थ चेन्नई ते कोईंबतूर प्रवासी विमान सेवा) या उद्देशाने ही कंपनी सुरू करण्यात आली होती. ही कंपनी सुरू करण्यास तामिळनाडू राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे आर्थिक पाठबळ होते अशी त्या काळात उद्योग क्षेत्रात कुजबूज होती. खरे खोटे देव जाणे! पण ही कंपनी काही कालावधीतच गुंडाळली गेली. ‘सहारा एअरलाईन्स’ ही सहारा समूहाची कंपनी. ही कंपनी त्यावेळी तुम्ही आसन क्रमांक घ्यायला गेल्यावर प्रत्येक प्रवाशाला चॉकलेटचा बॉक्स देत असे. पण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी काही या कंपनीला वाचवू शकली नाही. सध्या तर सहारा समूहाने सर्व गुंतवणूकदारांना बेसहारा करून टाकलेले आहे व सुब्रतो गुहा गजांआड आहेत. त्यानंतर क्रम लागतो तो किंगफिशरचा. फार मोठी ‘शो’बाजी करणारी ही कंपनी काहीकाळ चालली. ही कंपनी विमानात प्रवासी बसल्यानंतर त्यांना प्लास्टिक पाऊचमध्ये ४-५ वस्तू घालून ते ‘पाऊच’ भेट देत असे. किंगफिशर बंद झाल्यामुळे सार्वजनिक उद्योगातील दोनतीन बँकांची कित्येक कोटी रुपयांची कर्जे बुडित खात्यात जमा झाली असून या बँका आर्थिक अडचणीत आल्या आहेत. विजय मल्ल्या या माणसाकडे ‘शोमनशिप’ भरपूर आहे व या ‘शोमनशिप’ वृत्तीमुळे प्रचंड अनावश्यक खर्च करून मल्ल्यांनी ही कंपनी रसातळाला नेली. या सर्व पडझडीत मात्र मोकळे आकाश धोरण अमलात आल्यानंतर अस्तित्वात आलेली जेट एअरवेज अजून कार्यरत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र गोयल हे नुसते बाहुले असून या कंपनीचा पाठीमागून कर्ता-करविता दाऊद इब्राहिम हा आहे अशा चर्चा अधूनमधून ऐकू येत असतात. पण याबाबतचे पुरावे मात्र कोणाकडे काही नाहीत. प्रमोद महाजन व नरेंद्र गोयल हे एकमेकांचे मित्र. भाजप सत्तेवर असताना प्रमोद महाजन यांनी मात्र ही कंपनी कार्यरत राहावी म्हणून या कंपनीला बरीच मदत केली. तसेच प्रमोद महाजन यांचा मुलगाही काहीकाळ या कंपनीत पायलट पदावर नोकरीस होता.
या कंपन्या बंद होण्याची कारणे म्हणजे, या कंपन्यांनी अवास्तव खर्च केले. एअर इंडियाच्या वैमानिकांना तेथे मिळणार्‍या पगाराच्या कित्येक पट अधिक पगार देऊन आपल्या कंपन्यांत आणले. या कंपन्यांची स्वतःची विमाने नव्हती. परिणामी परदेशी कंपन्यांकडून या कंपन्यांनी भाड्याने विमाने घेतली होती. विमाने उभी करण्याच्या ‘हँगर’साठीही या कंपन्यांना सरकारी कंपन्यांपेक्षा जास्त भाडे आकारले जायचे. या कंपन्या जेवण, नाष्टा वगैरे महागडा देत. तसेच इतरही बर्‍याच सुविधा देत. या सर्व प्रचंड खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची बाजू लंगडी पडत गेल्यामुळे भारतातील मोकळे आकाश धोरण फसले.
दरम्यानच्या काळात इंडिगो, गो एअर, स्पाईसजेट व एअर डेक्कन या कंपन्या अस्तित्वात आल्या. यांपैकी एअर डेक्कन पूर्णतः अयशस्वी ठरली. इंडिगो, गो एअर व स्पाईसजेट या कंपन्यांनी विमान प्रवासाची संकल्पना बदलली. विमानात चढल्याबरोबर ‘फ्रेश’ होण्यासाठी प्रवाशाला कोलनवॉटरमध्ये भिजविलेला टॉवेल देत, कानात घालायला कापूस देत, पेपरमिंट देत, पाण्याच्या बाटल्या देत, वेळेनुसार नाष्टा किंवा जेवण देत. या सर्व सुविधा या कंपन्यांनी बंद करून ‘लॉकॉस्ट’ विमानसेवा ही संकल्पना राबविली. अगदी अल्प रुपयांत विमान प्रवास करण्याची संधीही त्यांनी दिली व ती यशस्वी झाली असे मानावेच लागेल. कारण काही वर्षे या कंपन्या कार्यरत आहेत.
या पार्श्‍वभूमीवर आता मोकळे आकाश धोरण पुनःश्‍च हरिॐ करीत असून या धोरणाची सेकंड इनिंग सुरू होत आहे. लवकरच सात नव्या कंपन्यांची विमाने आकाशात झेपावताना दिसतील. टाटा समूहाची भागीदारी असलेली एअर एशिया या कंपनीची विमान वाहतूक सेवा लवकरच सुरू होईल. या कंपनीने वरिष्ठ पदांवर नुकतीच नेमणूक केली. याशिवाय प्रवासी विमान वाहतूक मंत्रालयाने सहा नव्या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना नुकतीच परवानगी दिली. यांपैकी तीन कंपन्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत राहणार असून, तीन कंपन्या प्रादेशिक पातळीवर कार्यरत राहणार आहेत. एअर वन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, झेक्सस एअर व प्रिमियर एअर प्लान या तीन कंपन्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत राहणार आहेत. टर्बो मेघा, एअर कार्निवल व झाव एअरवेज या कंपन्या प्रादेशिक पातळीवर कार्यरत राहणार आहेत.
एअर वन या कंपनीचे संस्थापक अलोक शर्मा व त्यांची पत्नी शशीबाला ही आहेत. अलोक शर्मा हे बंद पडलेल्या एअर सहाराचे अध्यक्ष होते, तसेच त्यांनी मोदीलुफ्त या कंपनीतही काम केले आहे. या कंपनीकडे १०३ कोटी रुपयांचे भागभांडवल असून ६ चार्टर विमाने आहेत. मार्च २०१५ पासून या कंपनीची विमाने उडतील असा अंदाज आहे. ‘प्रिमिअर एअरवेज’- उमापथी पिनाघापानी हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. ही ‘लो कॉस्ट’ विमान कंपनी असेल. उमापथी हे भारतीय नागरिक असून सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. ‘टर्बो मेघा’- दक्षिणेतील चित्रपट कलाकार चिरंजिवी यांचा मुलगा रामचरण व वंकायालापती उमेश हे या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीचे मुख्य कार्यालय हैद्राबाद येथे असेल. या कंपनीच्या ताफ्यात सध्या दोन विमाने आहेत. ‘एअर कार्निवल’ हिचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. एस. आय. नाथन यांनी ही कंपनी स्थापन केली. ‘झाव एअरवेज’- भारतातील पूर्व व ईशान्य भागात ही कंपनी विमानसेवा सुरू करणार आहे. कोलकातावासी किशोर झवेरी या कंपनीचे प्रवर्तक आहेत. ही कंपनी सुरुवातीस हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार आहे. ‘झेक्सास एअर’- या कंपनीचे मुख्यालयही दिल्लीत आहे. मोकळ्या आकाश धोरणाची ही सेकंड इनिंग यशस्वी होईल का? पहिल्या प्रयत्नात ज्या कंपन्या बंद पडल्या, त्यांनी केलेल्या चुका टाळल्या तर यश मिळू शकेल. भारतात सध्या विमानाची तिकिटेही सहजासहजी मिळत नाहीत. या कंपन्यांसाठी ‘मार्केट’ आहे, पण या कंपन्या किती सावधपणे मार्केट ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतील यावर यांचे यश अवलंबून आहे. आता एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स यांचे एकत्रिकरण झाले आहे. हा सरकारी उपक्रम प्रचंड तोट्यात असून मधल्या काळात तर त्यांच्याकडे कर्मचार्‍यांना पगार द्यायलाही पैसे नव्हते. आतापर्यंत सत्ता भोगलेल्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे एअर इंडिया तोट्यात आहे. आता नवीन सरकार ही कंपनी फायद्यात येण्यासाठी काय करणार हे आपल्याला काही कालावधीत दिसेल. मोकळ्या आकाश धोरणाच्या दुसर्‍या टप्प्यात अस्तित्वात येणार्‍या सर्व कंपन्यांना शुभेच्छा!