मैनापी आणि सावरी धबधब्यांचे लावण्य!

0
217

– प्रा. राजेंद्र पां. केरकर

डोंगर माथ्यावरून किंवा एखाद्या उंचवट्यावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह जेव्हा प्रपाताचे अथवा धबधब्याचे रूप धारण करतो तेव्हा तो निसर्गप्रेमींना नेत्रसुखद असा अनुभव प्रदान करतो. मानवी जीवनाला ज्या नैसर्गिक सौंदर्याने भारावून टाकलेले आहे त्यात धबधब्यांचे स्थान उल्लेखनीय असेच आहे. काही धबधबे बारामाही कोसळत असले तरी त्यांचा उत्स्फूर्त आविष्कार अनुभवायचा असेल तर पावसासारखा अन्य मोसम नाही. मान्सूनचा पाऊस जेव्हा पश्‍चिम घाटात सुरू होतो तेव्हा मृत झालेली असंख्य तृणपाती जशी हिरव्या-पोपटी वैभवाने तरारून उठतात आणि रंगीबेरंगी रानपुष्पांनी डोळ्यांचे पारणे फेडतात त्याचप्रमाणे कडेकपारीतून पावसाच्या पाण्याचे लोट दुधाचे घट फुटावे तद्वत कोसळू लागतात. गोव्याची भूमी दूधसागराच्या धबधब्याचे जसे वैभव मोले राष्ट्रीय उद्यानातील काळ्याकभिन्न कातळाच्या माथ्यावरती मिरवते अगदी त्याचप्रमाणे पश्‍चिम घाटातील काही कातळ एकापेक्षा एक धबधब्यांचे लावण्य मिरवतात. दक्षिण गोव्यातील सांगे हा सर्वाधिक जंगलाने व्यापलेला प्रदेश. वृक्षवेलींनी संपन्न असलेल्या जंगलामुळे सांगेत बारामाही अखंडपणे वहाणारे धबधबे अनुभवायला मिळतात. सांगेत असलेले नेत्रावळी अभयारण्य हा गोव्यातला नितांत सुंदर असा परिसर. खनिज संपत्तीच्या उत्खननाचे आवासून असलेले संकट या परिसराला अभयारण्याचे सुरक्षा कवच लाभल्याकारणाने सध्या तरी दुरावलेले असल्याने आज इथे बारामाही वाहणारे धबधबे पहाणे शक्य झालेले आहे.

दक्षिण गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जुवारीच्या बर्‍याच उपनद्यांचा उगम नेत्रावळीच्या जंगलात होतो. केवळ जुवारीच नव्हे तर दीघी घाटाच्या जंगलातून कारवारची काळी गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी या ठिकाणी उगम पावते. खनिज उत्खनन अभयारण्याच्या अधिसूचित क्षेत्रांतून वगळल्याने इथून वहाणारे जलस्रोत बारामाही अखंडपणे वहातात. नेत्रावळीच्या अभयारण्यात पाली, सोनावल, मैनापी आणि सावरी असे चार महत्त्वाचे धबधबे आहेत, त्यांपैकी मैनापी आणि सावरी हे दोन धबधबे वर्षाचे बारा महीने कोसळत असल्याने त्यांना इथल्या नैसर्गिक सौंदर्याच्या वारसा स्थळांत अविस्मरणीय स्थान प्राप्त झालेले आहे. एकेकाळी घाटमार्गाच्या परिसरात नेत्रावळी हा गाव वसलेला असल्याने तेथे गोवा कदंब राजवटीतल्या मूर्ती शिल्पाच्या वैभवाची संचिते पहायला मिळतात. नेत्रावळीच्या शेजारी असलेला विचुंद्रे गाव नारायणदेवाच्या, दुर्गादेवीच्या जुन्या मंदिरासाठी ख्यात आहे. तेथील बागायतदार हर्षद प्रभुदेसाई यांच्या मालकीच्या शेतजमिनीत असलेले जांभ्या दगडातले लावण्य शोभावे असे असलेले तळे आणि तेथील मूर्ती शिल्प असो किंवा बुडबुड्याच्या तळीसाठी प्रसिद्ध असलेले गोपीनाथ मंदिर नेत्रावळीच्या तळे वाड्यावरती पहायला मिळतात. सांगेहून काणकोणला जाण्यासाठी पूर्वी जो आंबा घाट होता तो नेत्रावळीच्या जंगलातून जातो. नेत्रावळीच्या माथ्यावरती तुडव, सालजिणी आणि वेर्ले ही गावे आहेत. तेथून उत्तर कन्नड या कर्नाटकातल्या जिल्ह्यात जाता येते. अशा नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक वैभवाचा वारसा मिरवणार्‍या नेत्रावळीच्या सौंदर्याचे झळाळते मुकुटमणि शोभावे तद्वत सावरी आणि मैनापी धबधबे आहेत.
नेत्रावळी गावात मडगावहून केपे, जांबावली, रिवण, विचुंद्रे मार्गे, सावर्डे – कुडचडेहून सांगे, उगे, भाटीमार्गे जाता येते. आकाशाला गवसणी घालणारी राम, रावण, पाली डोंगरांची उंच शिखरे आणि सह्याद्रीच्या पर्वत शृंखलात वसलेल्या शेती आणि बागायतीच्या नेत्रावळी गावातून वेर्ले जाण्याच्या डाव्या बाजूला मैनापी तर उजव्या बाजूला सावरी धबधबे आहेत. इथल्या दर्‍याखोर्‍यांविषयी उदंड प्रेम मिरवणारे पुती गावकर, हा वारसा टिकावा म्हणून प्रयत्नरत असलेली दामोदर गवळीसारखी माणसे या आतिथ्यशिलता स्थायिभाव असलेल्या गावाचे वैभव आहेत. नेत्रावळीच्या बांधवाड्यावरून जाणारी जंगलवाट माडत, किंदळ अशा स्वदेशी वृक्षांच्या सावलीतून मैनापीच्या धबधब्याजवळ जाते. नेत्रावळी नदीच्या पात्रात असलेल्या दगड धोंड्यांतून आपण जेव्हा मार्गक्रमण करू लागतो तेव्हा स्वच्छंदपणे भिरभिरणारी फुलपाखरे, वृक्षांच्या फांद्यावरती किलबिलाट करणारे कोतवाल, बुलबुल, दयाळसारखे पक्षी आणि नदीपात्रातून जाताना पायांना गुदगुल्या करणारे मासे… हे सारे आपणाला वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात. मैनापी धबधबा ज्या जंगलात वसलेला आहे तेथे पक्षी, भौसुलो, जमलिसारखी महाकाय झाडे जागोजागी वसलेली आहेत. पावसाळ्यात मैनापी धबधब्यावरती जाणे अत्यंत जोखमीचे. पावसाच्या पाण्याचे लोट सहस्र मार्गांनी नेत्रावळी नदीशी इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्रित होऊन वहातात की या कालखंडात बांधवाड्यावरून जाणे म्हणजे तळहाती शीर घेऊन गेल्यासारखे असते. त्यामुळे बरेच जण नेत्रावळीहून तुडोवला जाताना डोंगरातल्या पायवाटेच्या आधाराने मैनापीला जाण्याचा प्रयत्न करतात. मैनापीला जाण्यासाठी पावसाळा ओसरू लागल्यावरती येणारा शरद ऋतु हा अधिक आल्हाददायक कालखंड असतो. नदीच्या पात्रातून आपण दरमजल करत जेव्हा शेवटी धबधब्याजवळ पोहचू लागतो तेव्हा धीरगंभीरपणे कल्लोळ करत कोसळणारे त्याचे पाणी आणि त्यातून निर्माण होणारा ध्वनी आपणाला मैनापीच्या अस्तित्वाची कल्पना देऊ लागतात. कधीकाळी जंगल मैनेचे थवेच्या थवे या धबधब्याच्या परिसरात पाणी प्यायला येत असल्याने त्याला मैनापी असे नाव लाभले असावे. कर्नाटकातल्या सीमाभागातले पाणी हिरव्या जंगलाच्या कुशीतून तुडोवला येते आणि तेथे हजारो वर्षांपासून असलेल्या काळ्या कातळावरून हे पाणी जेव्हा कोसळू लागते तेव्हा नयनरम्य अशा सौंदर्याची प्रचिती येते. धबधब्याच्या दोन्ही बाजूंना असलेले शिलाखंड बारामाही वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे ओलसरपणा अनुभवत असल्याने इथे वेगवेगळ्या मोसमात नानाविविध रानपुष्पांचे वैभव अनुभवण्यास मिळते. या जंगलाच्या वाटेवरती कार्वीची झुडपे आहेत. त्यातली काही झुडपे दर तीन वर्षांनी तर काही दर सात वर्षांनी विलोभनीय असा रानपुष्पांचा नजराणा पेश करतात. फिकट निळी, जांभळ्या रंगछटा मिरवणार्‍या या फुलांतला मध गोळा करण्यासाठी फुलपाखरे, कृमीकीटक विहरताना आढळतात. मैनापी धबधबा पावसात रौद्र भीषण तांडव करत कोसळतो. अखंडपणे पाणी कोसळत असल्याने धबधब्याच्या पायथ्याशी खोल डोह निर्माण झालेला असून, आत लपलेले मोठे दगड सहसा दृष्टीस पडत नसल्याने, इथे आंघोळ करणे म्हणजे संकटांना निमंत्रण ठरत असते.
नेत्रावळीतले सावरी आणि मैनापी हे दोन्ही बारामाही कोसळणारे धबधबे असले तरी त्या दोन्ही धबधब्यांची नजाकत एकमेकांपासून भिन्न आहे. मैनापीच्या तुलनेत सावरीची उंची किंचित कमी असली तरी कातळावरून कोसळणार्‍या त्याच्या जलस्रोताचे देखणेपण ठसठशीतपणे नजरेत भरणारे असेच आहे. या धबधब्याला सावरी हे नाव मिळण्यामागे कधीकाळी इथल्या लोकवस्तीच्या ठिकाणी भली थोरली सावर होती असे वयोवृद्ध सांगतात. नेत्रावळीतल्या लोकवस्तीचा जेव्हा विस्तार होत गेला तेव्हा इथे असलेल्या सावरीच्या वृक्षाने भूमीपुत्रांना मोहिनी घातली. तिच्या सभोवताली वाहणारे पाणी आणि हिरवाईने नटलेले डोंगर, त्याचप्रमाणे पिकाऊ जमीन यामुळे त्यांनी आपले बस्तान इथे मांडले. इथे जंगलनिवासी वेळीप जमातीचे कष्टकरी रहात असल्याने, उन्हाळ्यात त्यांच्या शेती, बागायतीला पाणी पुरवून या धबधब्याने सावरले असले पाहिजे आणि त्यामुळेही बहुधा हा धबधबा सावरी म्हणून ओळखला गेला असावा. परंतु काही का असेना हा धबधबा नेत्रावळी अभयारण्याच्या सौंदर्याच्या अभिवृद्धीत मोलाची भर घालत आलेला आहे. ‘मैनापी’च्या तुलनेत सावरी धबधब्याकडे जाणार्‍या नदीतल्या दगडधोंड्यांना पायी तुडवत जाणारी पायवाट विशेष जोखमीची नाही. सावरी येथील लोकवस्तीचा भाग ओलांडून आपण जेव्हा वृक्षवेलींच्या सावलीतून मार्गक्रमण करू लागतो तेव्हा सलामीलाच उजव्या बाजूला असलेले दलदलीतले वैशिष्ट्यपूर्ण जंगल आपले स्वागत करते. इंग्रजीतील उलट्या ‘यू’ आकाराची मुळे असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती जगात खूप कमी ठिकाणी पहायला मिळते. दलदलीच्या या जंगलात सदाहरित आणि उंच उंच नभाच्या दिशेने जाणार्‍या या झाडांच्या फांद्याफांद्यांवरती हमखास मलाबार पाईड होर्नबिल म्हणजे शिंगासारखी चोच आणि मस्तकी पिवळ्या रंगाच्या बाशिंगसारखा तुरा मिरवल्यागत वावरणारा पक्षी बर्‍याचदा पहायला मिळतो.
उंच उंच डेरेदार वृक्षांच्या थंडगार सावलीतून काही काळ चालत गेल्यावर ब्ल्यू मोरमोन आणि सदर्न बर्डविंगसारखी लक्ष वेधून घेणारी मोठी फुलपाखरे कधी भिरभिरताना तर कधी रानअबोली आणि सीता अशोकाच्या फुलांवरती मधपान करताना पहायला मिळतात. सदाहरित जंगल प्रदेशात आढळणारा सीतेचा अशोक आणि हिरव्यागार बेताच्या बनांनी चुकत असलेल्या पायवाटेवरून जाताना तनामनाला एक आगळेवेगळे समाधान इथे लाभते. सालजिणी-वेर्ले गावात सर्वांत उंच असलेला पर्वत रावणाच्या नावाने अजरामर झालेला आहे. या रावण डोंगराच्या भोवताली असलेल्या वृक्षांच्या आच्छादनाने मान्सूनच्या कोसळणार्‍या पर्जन्यधारा रावण डोंगराच्या भूगर्भात जातात आणि त्यामुळे वर्षाचे बारा महीने असंख्य लहानमोठ्या झर्‍यांचे पाणी एकत्रित होऊन एका महाकाय शिलाखंडावरून अविरतपणे कोसळतात आणि त्यामुळेच या धबधब्याचे सौंदर्य खाली उभे राहून पहाणार्‍यास तृप्तीचा अनोखा अनुभव देते. नदीच्या पात्रातून लहानमोठे दगड ओलांडत आपण एका वळणावरती पोहचतो तेव्हा सावरी धबधब्याचा आवाज आपल्या अस्तित्वाची चुणूक आणून देतो. हिरव्या जंगलाच्या पार्श्‍वभूमीवरती कातळावरून खाली कोसळणारा सावरी धबधब्याच्या पाण्याचा स्रोत पहाताना चित्तवृत्ती फुलून येतात. हे दोन्ही धबधबे म्हणजे नेत्रावळीच्या अभयारण्याने दिलेली अनमोल अशी देणगी आहे.
………….