मैदानावरच निवृत्ती जाहीर करणे योग्य

0
160

>> महेंद्रसिंग धोनीची पद्धत इंझमाम उल हकला खटकली

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल-हक धोनीच्या निवृत्ती जाहीर करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. धोनीने घरी बसून निर्णय घेण्याऐवजी मैदानात प्रेक्षकांसमोर घोषणा केली असती तर त्याचे कोट्यवधी चाहते अधिक सुखावले असते. आपला यूट्यूब चॅनल इंझमाम उल हक ‘द मॅच विनर’ वर बोलताना इंझमाम याने आपले हे मत व्यक्त केले.

तो पुढे म्हणाला की, सचिनच्या मनात निवृत्तीचा विचार घोळत असताना त्यालादेखील मी मैदानातच निवृत्ती जाहीर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानेदेखील मैदानातच निवृत्ती स्वीकारली. सचिन तेंडुलकरनेही जिथून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तिकडेच निवृत्ती स्वीकारली. जगभरात धोनीचे अनेक चाहते आहेत. त्यांना धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरचे मैदानाच पाहण्याची इच्छा असणार. माझ्यामते धोनीसारख्या खेळाडूने घरी बसून निवृत्तीचा निर्णय घेणे योग्य नाही. त्याने मैदानात आपला निवृत्तीचा निर्णय घ्यायला हवा होता. ज्यावेळी तुम्हाला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळते, जगभरात तुमचे कोट्यवधी चाहते असतात अशा खेळाडूंनी मैदानातच निवृत्ती जाहीर करायला हवी. कारण त्याच मैदानातून तुमची सुरुवात झालेली असते. माझ्या दृष्टीकोनातून धोनी भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने मैदानात निवृत्ती स्विकारायला हवी होती.

खेळाडूंची बांधणी करण्याच्या कुशलतेमुळे धोनीचे नेतृत्व उठून दिसत होते. खेळाची व खेळाडूंची पारख करण्यात धोनीचा हात धरणारा कुणीच नव्हता. सर्वसामान्य खेळाडूंना विश्‍वास देऊन त्यांना ‘ग्रेट’ बनविण्यात धोनी निष्णांत होता असे इंझमामने सुरेश रैना व रविचंद्रन अश्‍विन यांचे उदाहरण देत सांगितले.

धोनी सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करतो आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या खेळाडूंसाठी १५ ते २० ऑगस्टदरम्यान चेन्नईत एम.ए.चिदंबरम मैदानात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. धोनीसह रैना, केदार जाधव, पीयुष चावला, कर्ण शर्मा असे अनेक खेळाडू या शिबिरामध्ये सहभागी झालेत. २० ऑगस्टनंतर चेन्नईचे खेळाडू यूएईला रवाना होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी पुढचे काही हंगाम आयपीएल खेळत राहणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलच्या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे.