
भारताची १७ वर्षीय युवा नेमबाज मेहुली घोष हिने काल सोमवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले. तिने अखेरच्या काही प्रयत्नांत अनुभवी अपूर्वी चंडेला हिला मागे टाकले. सुवर्णपदकसाठी बरोबरी झाल्यामुळे झालेल्या शूटआऊटमध्ये हरल्यामुळे तिला रौप्यवर समाधान मानावे लागले. ग्लास्गोतील राष्ट्रकुल स्पर्धेत याच प्रकारात सुवर्ण जिंकलेल्या २५ वर्षीय अपूर्वीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीतील पहिल्या टप्प्यात वर्चस्व गाजवल्यानंतर शेवटच्या दोन प्रयत्नांत ९.९ व ९.४ गुणांमुळे तिची तिसर्या स्थानी घसरण झाली. तिने २२५.३ तर मेहुलीने २४७.२ गुण घेतले. मेहुली व सिंगापूरची वेलोसो यांचे समान गुण झाल्याने सुवर्णपदक ठरविण्यासाठी शूटआऊटचा अवलंब करावा लागला. यामध्ये वेसोलोने १०.३ तर मेहुलीने ९.९ गुणांचा वेध घेतला. तत्पूर्वी, पात्रता फेरीत अपूर्वीने ४३२.२ गुण मिळवत स्पर्धा पात्रता विक्रमाची नोंद केली. तर मेहुलीने ४१३.७ गुणांसह पाचव्या स्थान मिळविले. आपली पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा खेळत असलेल्या बंगालच्या या सनसनाटीने आपल्या कामगिरीने भारताने नेमबाजीतील भविष्य उज्ज्वल असल्याचे काल दाखवून दिले.