अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याने बुधवारी रात्री ला लिगाच्या सामन्यामध्ये आपल्या कारकिर्दीतील ७०० व्या गोलची नोंद केला. कारकिर्दीत ७०० गोल करणारा मेस्सी हा दुसरा सक्रिय खेळाडू आहे. बार्सिलोनाच्या लिओनल मेस्सीने बुधवारी कॅम्प नाऊ स्टेडियमवर ऍटलेटिको माद्रिद विरूद्ध झालेल्या सामन्यात ७०० वा गोल झळकावला. या सामन्याच्या ५०व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर खेळांप्रमाणे फुटबॉलचे सामनेदेखील ही बंद ठेवण्यात आले होते. पण सामने पुन्हा सुरु झाल्यानंतर मेस्सीने आपली लय कायम राखत नवा मैलाचा दगड गाठला.
मेस्सीच्या या ७०० गोलपैकी त्याने बार्सिलोनासाठी ७२४ सामन्यांत ६३० तर अर्जेंटिनासाठी १३८ सामन्यांत ७० गोल केले आहेत. याशिवाय मैत्रिपूर्ण लढतींमधील गोल मोजल्यास त्याने एकूण ७३५ गोल आतापर्यंत नोंदविले आहेत. मेस्सीने कारकिर्दीतील पहिला गोल १ मे २००५ ला अल्बॅसेट विरूद्ध कॅम्प नाऊच्या सामन्यात केला होता. मेस्सी शिवाय ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही त्याच्या कारकिर्दीत यापूर्वी ७०० गोल लगावले आहेत. मात्र मेस्सीने ७०० गोलचा टप्पा ८६१ सामन्यांमध्ये तर रोनाल्डोने ९७३ सामन्यांमध्ये पार केला. बार्सिलोना आणि ऍटलेटिको माद्रिद यांच्यातील बुधवारचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. या बरोबरीमुळे बार्सिलोना ‘ला लिगा’ गुणतक्त्यात रियल माद्रिदला मागे टाकून पहिले स्थान मिळवण्यात अपयशी ठरलाय. बार्सिलोनाचे आता ७० गुण आहेत तर पहिल्या क्रमांकावरील रियल माद्रिद ७१ गुणांवर आहे.