मेळावली-सत्तरीत बेकायदा चिरेखाणीवर छापा

0
24

>> 50 लाखांची यंत्रसामुग्री जप्त; चार जणांना अटक

सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर चिरेखाणी सुरू असून, खाण खात्याने काल गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली येथे बेकायदा चिरेखाणीवर छापा टाकून 50 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. दोन जेसीबी मशीन, चिरे काढण्याचे मशीन, पावर ट्रिलर, चिरे कटिंग करण्याचे मशीन व चिऱ्याची वाहतूक करणारे ट्रक जप्त करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. खाण खात्याचे अधिकारी जितेंद्र वेळूस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला.

सविस्तर माहितीनुसार, गुळेली पंचायत क्षेत्रात मेळावली येथे बेकायदेशीर चिरेखाणी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी गुळेली पंचायत, वाळपई पोलीस, वाळपई मामलेदार, वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र त्या तक्रारींची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर काही नागरिकांनी खाण खात्याशी संपर्क साधून त्याबाबत तक्रार केली. गुरुवारी दुपारी खाण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मशिनरी व अन्य यंत्रसामुग्री जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यात चिरेखणीचा व्यवसाय करणारा मालक सलमान शेख (रा. तिस्क-उसगाव), जेसीबी मशीनचा ऑपरेटर राकेश कुमार, सरोज कुमार व ट्रक चालक इम्रान शेख या चार जणांना अटक केली आहे. त्यांना वाळपई पोलीस स्थानकाच्या कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्यावर चिरेखाणीचा बेकायदेशीर व्यवहार करणे व नैसर्गिक मालमत्तेची लुट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ज्यावेळी हा छापा टाकण्यात आला, त्यावेळी सर्व संशयित पळ काढण्याच्या तयारीत होते; मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या छाप्यात दोन जेसीबी मशीन, चिरे काढण्याचे मशीन, पावर ट्रिलर, चिरे कटिंग करण्याचे मशीन व चिऱ्याची वाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेण्यात आले. सध्यातरी ही मालमत्ता वाळपई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे.

दरम्यान, मेळावली येथे रात्रंदिवस या ठिकाणी मशीनचा वापर करून मोठ्या प्रमाणात चिरे उत्खनन करण्यात येत होते. त्यामुळे सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो. शिवाय धुळीचाही सामना करावा लागत होता.

इतर बेकायदा चिरेखाणींवर कारवाई कधी?
प्राप्त माहितीनुसार मेळावली येथील ही बेकायदा चिरेखाण दोन वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू होती. याच पंचायत क्षेत्रामध्ये मुरमुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा चिरेखाणी सुरू आहेत. आता खाण खात्याचे पथक मुरमुणे या ठिकाणी छापा टाकून कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.