>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार
शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन तेथे न उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री विश्वजित राणे व प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. आल्तिनो येथील आपल्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
काल शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी शेळ-मेळावली येथील काही ग्रामस्थ, जिल्हा पंचायत सदस्य, पंच सदस्य यांच्या उद्योगमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी स्थानिकांनी शेळ-मेळावली येथून आयआयटी प्रकल्प हलवावा, असे निवेदन सरकारला सादर केले. त्यामुळे बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हजेरीत आयआयटी प्रकल्प शेळ-मेळावली येथे उभारण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्याची घोषणा केली.
या ग्रामस्थांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेळ-मेळावलीसह सत्तरी तालुक्याचा विकास नजरेसमोर ठेवून सरकारने तेथे आयआयटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता असे स्पष्ट केले. मात्र, स्थानिक लोकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध करून आंदोलन छेडल्यामुळे आता सरकारने हा प्रकल्प तेथे न उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजर असलेल्या मेळावलीच्या ग्रामस्थांना सांगितले.
ग्रामस्थांसमोर यावेळी बोलताना विश्वजित राणे यांनी शेळ-मेळावलीचा विकास व्हावा या हेतूनेच आपण तेथे आयआयटी प्रकल्प आणला होता, मात्र, तेथील लोकांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने सदर प्रकल्प तेथे उभारण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प अन्यत्र नेणार
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आयआयटी प्रकल्प आता शेळ-मेळावली येथे न उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, आयआयटी प्रकल्प राज्यात होणारच असून तो अन्यत्र हलवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयआयटी आता कुठे हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे विचारले असता अजून काही ठरले नसल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेपूर्वी शेळ-मेळावली येथील लोकांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारण्यामागे आपला तसेच विश्वजित राणे यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, असे सांगून काही लोकांनी आम्हा दोघांवर विनाकारण नको ते आरोप केल्याचे सावंत म्हणाले. सत्तरी आयआयटी उभी झाली असती तर सत्तरीचा सर्वांगिण विकास झाला असता व त्याची फळे स्थानिक लोकांना चाखता आली असती, असे सावंत म्हणाले.
तत्पूर्वी स्थानिक लोकांसमोर बोलताना विश्वजित राणे म्हणाले, की शेळ-मेळावली व पर्यायाने सत्तरीचा विकास व्हावा यासाठीच आपण सत्तरीत आयआयटी आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, स्थानिक लोकांना तो नको असल्याने मुख्यमंत्र्यांनी तो आता सत्तरीबाहेर न्यावा, असे सांगितले.
विरोधकांकडून दिशाभूल
राज्यभरात होऊ घातलेल्या विविध विकास प्रकल्पांना जे लोक विरोध करीत आहेत त्याच लोकांनी शेळ-मेळावली येथे जाऊन स्थानिक लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले व त्यामुळेच स्थानिक लोक आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात उभे राहिल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
गुन्हे मागे घेणार
शेळ-मेळावली येथे आंदोलनकर्ते व पोलीस यांच्यात जेव्हा धुमश्चक्री झाली तेव्हा कुठल्याही पोलिसाने कुठल्याच आंदोलनकर्त्याच्या पोटावर पाय ठेवला नव्हता, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आंदोलनकर्त्यांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात मात्र एक महिला पोलीस शिपाई जखमी झाली होती, असे ते म्हणाले. या धुमश्चक्रीत ज्या आंदोलनकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप ठेवून पोलिसात गुन्हे नोंदवण्यात आले होते त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील काय, असे पत्रकारांनी सावंत यांना विचारले असता गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले.