मेरीकोम अंतिम फेरीत

0
101

पाचवेळच्या विश्‍वविजेत्या एमसी मेरीकोम हिने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. शिवा थापा व मनोज कुमार यांना मात्र उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेसाठी १२वे मानांकन लाभलेल्या मेरीकोमचा ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत फिलिपिन्सच्या जोसी गोबुको हिच्याशी सामना करावा लागणार आहे. गोबुकोने स्थानिक फेव्हरिट व द्वितीय मानांकित मोनिकाला गारद करत सनसनाटी निकालाची नोंद केली. उपांत्य फेरीतील मेरीकोमचा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मगोलियाच्या अल्तानसेतसेग लुतसायखान हिच्याविरुद्ध पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये आक्रमक खेळ दाखवल्यानंतर सामन्यातील शेवटच्या तीन मिनिटांत मेरीकोमच्या हालचाली मंदावल्या. या स्थितीतही तिने प्रतिस्पर्ध्याला रोखून धरत पहिल्या दोन फेर्‍यांतील कामगिरीच्या बळावर अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या ६० किलो वजनीगटात अव्वल मानांकित शिवा याला भारताच्याच मनीष कौशिक याने पराभूत केले. ६९ किलोवजनी गटातही मनोज कुमार (६९ किलो) या प्रबळ दावेदाराला दिनेशकडून हार पत्करावी लागली. ४९ किलो फ्लाईटवेट गटात अमित फंगल याने नुतलाय लालबियाकिम्मा याला नमवून अंतिम फेरीत स्थान मिळविले.