एमसी मेरीकोमने कोरियाच्या किम ह्यांग मी हिचा ४८ किलो वजनी गटात पराभव करत पाचव्यांदा आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटीमध्ये बुधवारी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आला. पाचवेळच्या विश्वविजेत्या व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीकोमने अंतिम फेरीत ५-० अशा फरकाने विजय संपादन केला.
जागतिक अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या सोनिया लाठड हिला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत तीनपैकी दोन पंचांनी चीनच्या यिन जुनहुआ हिच्याबाजूने निकाल दिला. यामुळे भारताला केवळ या स्पर्धेत केवळ एका सुवर्णपदकावर समाधान मानावे लागले. याव्यतिरिक्त भारताने १ रौप्य व ५ कांस्यपदके मिळविली.आपल्या आवडत्या ४८ किलो वजनी गटात खेळताना विजेतेपदाला गवसणी घातली.
२०१४ साली आशिया चषक स्पर्धेत ५१ किलो गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर मेरीकोमचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्ण व एका वर्षानंतर मिळविलेले पहिलेच पदक ठरले. उपांत्य फेरीत मेरीकोमने त्सुबासा कोमुरा हिला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महिलांच्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील सहा स्पर्धांतील मेरीकोमचे हे पाचवे पदक ठरले. मेरीने यापूर्वी चार सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावले आहे.