मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांचा संशयास्पद मृत्यू

0
147

मेरशीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य प्रकाश नाईक काल सकाळी त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. प्रकाश नाईक याच्या अंगावर बंदुकीच्या गोळीच्या जखमा आढळून आलेल्या आहेत. पोलिसांकडून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रकाश नाईक यानी मृत्यूपूर्वी आपल्या व्हॉट्‌अप ग्रुपवरील मित्रांना एक संदेश पाठविला आहे. त्यात दोघा व्यक्तींकडून होणारी सतावणूक सहन न झाल्याने आपल्यावर आत्महत्या करण्याची पाळी आल्याचे नमूद केले आहे. प्रकाश यांच्या मृत्यू प्रकरणामुळे मेरशी, पणजी, सांताक्रुझ, चिंबल परिसरात खळबळ उडाली. या मृत्यूप्रकरणाची सर्व अंगांनी चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनानंतर चौकशीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच ओल्ड गोवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशीला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशीसाठी मार्गदर्शन केले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने मेरशी येथे घटनास्थळी जाऊन तपासणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनैर्गिक मृत्यू नोंद केली आहे. ही घटना घडली त्यावेळी कुटुंबिय सातेरी देवालायत पूजेला गेले होते.

शुक्रवारी १०.४० वा. मित्रांना संदेश
प्रकाश नाईक यानी शुक्रवारी सकाळी १०.४० वाजता आपल्या मित्रांना पाठविलेल्या संदेशात दोघा व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. त्यात राज्यातील एका मंत्र्याच्या बंधूच्या नावाचा समावेश आहे. प्रकाश यानी मित्रांना पाठविलेल्या संदेशांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. व्हडले भाट येथील उद्यानामुळे आपण मानसिक तणावाखाली आहे. उद्यानाच्या बांधकामासाठी पैसे दिले. रस्ता तयार करण्यासाठी मान्यता दिली. परंतु, दोघांनी आपली फसवणूक केली आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यांचा दबाव सहन होत नाही. आपण आत्महत्या करीत आहे. आपल्या मृत्यूला दोघांना जबाबदार धरले पाहिजे. त्यांनी माझ्या कुटुंबाला दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली पाहिजे. मित्रांनो माझ्या कुटुंबाला दुःखाच्या काळात सहकार्य करा, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.