हरविंग लोझानोने पहिल्या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मेक्सिकोने विद्यमान विजेत्या जर्मन संघाला जोरदार धक्का देताना विजयी सलामी दिली. यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील हा पहिला मोठा उलटफेर ठरला. त्यामुळे आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात जर्मनीला सलामीच्या सामन्यात पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले.
दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. सुरुवातीला दोन्ही संघांनी साधव खेळावर भर दिला होता. परंतु पहिल्या सत्राच्या मध्यंतरानंतर मेक्सिकन संघाने जोरदार खेळ केला. त्यात त्यांना ३५व्या मिनिटाला जर्मनीची बचावफळी भेदण्यात यश आले. आणि जेवियर हर्नांडेझच्या पासवर हरविंग लोझानोने जोरकस फटक्याद्वारे जर्मनीच्या गोलपोस्टची जाळी भेदत सामन्यातील एकमेव विजयी गोल नोंदविला. बर्याच दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या जर्मनीने मेक्सिकोवर आक्रमण करत सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मेक्सिकोच्या गोलरक्षकाच्या अभेद्य बचावापुढे त्यांचे काहीही चालू शकले नाही.ओझिल, मुलर यांसारख्या नावाजलेल्या खेळाडूंचे आक्रमण मेक्सिकन बचावफळीने परतवून लावण्यात यश मिळविले.
मेक्सिकोच्या फुटबॉल इतिहासातील हा एक मोठा विजय ठरला. दोन वेळा यजमानपद भूषविलेल्या मेक्सिकन संघाला आतापर्यंत अजून एकदाही उपांत्यपूर्व फेरी पार करता आलेली नाही. तर जर्मन संघ आपल्या पाचव्या विश्वजेतेपदासाठी लढत आहे आणि यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी ते एक प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता त्यांचा पुढील सामना स्वीडनशी होणार आहे. तर मेक्सिकन संघ दक्षिण कोरियाविरुद्ध लढणार आहे.
मेक्सिकोच्या मारक्वेझने या सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद केली. मारक्वेझचा हा पाचवा विश्वचषक ठरला आहे. यासह मारक्वेझने मेक्सिकोच्या ऍन्टोनियो कारवाएल आणि जर्मनीच्या लोथर मथाएसच्या विक्रमाशी बरोबरी केली.