मेंदूत रक्तस्त्राव; सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर शस्त्रक्रिया

0
15

आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता आणि उलट्या होत होत्या. परिणामी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे एमआरआय अहवालातून समोर आले होते.

गेल्या काही आठवड्यांपासून सद्गुरू जग्गी वासुदेव यांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास होत होता. हा त्रास गंभीर असून देखील त्यांनी दैनंदिन कार्यक्रम आणि सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. 15 मार्च रोजी त्यांची प्रकृती बिघडली, त्याच दिवशी दुपारी पावणे चारच्या सुमारास दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल केले. न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांनी तातडीने एमआरआय करण्याचा सल्ला दिला. त्याच दिवशी 4.30 च्या सुमारास त्यांच्या मेंदूचा एमआरआय करण्यात आला. अहवालात त्यांच्या मेंदूला सूज आल्याचे आणि रक्तस्त्राव झाल्याचे आढळले होते. त्यानंतर 17 मार्चला त्यांच्यावर मेंदूवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली.