मृत्युंजय

0
139

दुःख आणि वेदना अनेकांच्या आयुष्यात नैराश्याचे वादळ निर्माण करतात. स्वतःवरचा आणि जीवनावरचा विश्वास डळमळतो आणि अशी माणसे स्वतःच स्वतःभोवती विणलेल्या नकारात्मकतेच्या कोषामध्ये गुरफटून संपून जातात. पण त्या दुःखाचा आणि वेदनांचा बाऊ न करता सोसणे हा धर्म समजून आत्यंतिक सकारात्मकतेने जीवनाला सामोरे जाणारी काही विलक्षण माणसे असतात, ज्यांच्या कर्तृत्वाच्या ध्वजा दशदिशांत फडकल्याविना राहात नाहीत. एकनाथ ठाकूर हे असेच एक व्यक्तिमत्त्व आपल्यातून नुकतेच निघून गेले. एका वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि दुसर्‍या वर्षी आईही गेली. कुडाळच्या मोठ्या बहिणीच्या घरी राहून खानावळीत गिर्‍हाइकांची पाने मांडत, किराणा मालाच्या दुकानात पुड्या बांधत त्यांनी शिक्षण घेतले. रात्रीची नोकरी करून उच्च शिक्षण मिळवले. पण दुर्दैवाने पाठ सोडली नाही. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. आधी जीभ, मग मान, पाठ, नसा असा कर्करोगाचा कराल पाश त्यांच्याभोवती आवळत जात असतानाही या संकटाने हताश आणि हतबल न होता ते आल्या परिस्थितीशी झुंज घेत राहिले. गेली तब्बल ४३ वर्षे त्यांची कर्करोगाशी ही झुंज सुरू होती. पण बालपणीच्या प्रतिकूल परिस्थितीचे आणि या जीवघेण्या दुर्धर दुखण्याचे त्यांनी कधी अवडंबर माजवले नाही. त्यांच्या शरीराला भले कर्करोगाने वेढले असेल, पण त्यांच्या अफाट कर्तृत्वाला काही तो बांध घालू शकला नाही. सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, सारस्वत बँकेसारख्या देशाच्या सहकारी बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील लखलखते सुवर्णपान असलेल्या प्रतिष्ठित बँकेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे माजी खासदार ही त्यांची ओळख पुरेशी नाही. ज्या काळात मराठी तरुण स्पर्धापरीक्षांमध्ये उतरायलाही बिचकत असे, अशा काळामध्ये नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो मराठी तरुणांना बँकेच्या परीक्षा कशा द्यायच्या याचे मार्गदर्शन केले आणि त्यांना उज्ज्वल भवितव्याचा मार्ग दाखवला. ते स्वतः स्टेट बँकेचे उच्चाधिकारी होते, पण आणीबाणीत त्यांनी तेथला राजीनामा दिला, पण बँकिंग क्षेत्राशी जुळलेले अनुबंध मात्र तुटले नाहीत. त्यांच्या संस्थेच्या मार्गदर्शनामुळे किमान सत्तर – ऐंशी हजार मराठी तरुणांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळाली. जवळजवळ साडे तीन लाख लोकांनी त्या संस्थेतून प्रशिक्षण घेतले. ज्या स्टेट बँकेतून राजीनामा देऊन बाहेर पडले होते, तिच्याच सेंट्रल बोर्डावर पुढे त्यांची वाजपेयी सरकारने नियुक्ती केली हाही एक योगायोग म्हणावा लागेल. शिवसेनेने त्यांची कर्तबगारी पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली होती. पण ‘लहू का रंग एक है’ यावर त्यांची श्रद्धा होती आणि राज्यसभेच्या पटलावरही त्यांनी ती स्पष्टपणाने व्यक्त केली होती. त्यांचा पिंड नाथ पै, एस. एम. जोशी अशा समाजवादी नेत्यांनी घडवला होता. बाबा आमटेंच्या भारत जोडो अभियानशीही ते जोडले गेले होते. जेव्हा किरण ठाकुरांच्या संस्थेने त्यांना लोकमान्य मातृभूमी पुरस्कार दिला, तेव्हा ती लाखोंची रक्कम त्यांनी नरेंद्र दाभोळकरांचे स्मरण म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देऊन टाकली. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तिन्हींचा संगम एकनाथ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. ते एक उत्तम संघटक होते. त्यांच्या नेतृत्वगुणांची साक्ष आज अत्यंत दिमाखात कार्यरत असलेली सारस्वत बँक देते आहे. सहा वर्षांपूर्वी या बँकेचे अध्यक्षपद हाती आल्यानंतर त्यांनी आजच्या ‘ब्रँडिंग’च्या जमान्याशी सुसंगत असा तिचा कायापालट घडवला. आर्थिक उलाढाल तर वाढतच गेली. देशभरात २७० शाखांचे जाळे आणि चाळीस हजार कोटींचे उद्दिष्ट ओलांडताच त्यांनी आपल्या बँकेला एक लाख कोटींचा संकल्पमंत्र घालून दिला. शून्य एनपीए असलेली ही बँक चार वर्षांनी येणार असलेल्या शताब्दीत यशाचे नवे शिखर सर करील एवढा आत्मविश्वास आणि आर्थिक शिस्त ठाकुरांनी तेथे पेरली आहे. ‘साफल्य ध्यासाने येते. माणसाने आधी सत्त्व टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे’ अशी त्यांची धारणा होती आणि बेळगावच्या सत्कारात त्यांनी ती व्यक्तही केली होती. ‘आत्मदीपो भव्’ म्हणत अंतरीचा दीप उजळवणारे आणि त्याचा प्रकाश आपल्याभोवतीच्या समाजालाही सतत देत आलेले एकनाथ ठाकूर खरोखर मृत्युंजयी ठरले आहेत.