राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत भेडसावणार्या वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून मूल्याधिष्ठित शिक्षण व योग हा एकमेव उपाय असल्याच्या निष्कर्षाप्रत सरकार आले असून त्यासाठी विद्यार्थ्यांना वरील शिक्षण सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद उर्फ कांता पाटणेकर यांनी दिली.महाराष्ट्रातील भारतीय जैन संघटनेने गोव्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणासाठीचा तर बेंगळूर येथील योगा विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार केल्याचे पाटणेकर यांनी सांगितले. लवकरच वरील प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारसमोर ठेवणार असल्याचे ते म्हणाले. जगातील १३० देशांनी या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. त्यामुळे गोव्यात हा अभ्यासक्रम सुरू करण्यास अडचण असू नये, असे ते म्हणाले.
समुपदेशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमधून समस्या असल्याचे सर्वेक्षण करून उपाय सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. वर्तन समस्या, शिकण्यास अडचण, अभ्यासात अडचण, भावनिक समस्या, प्रेमसंबंध विषयक, मानसिक समस्या, आरोग्य, करिअरसंबंधी समस्या, चिंता, आत्महत्येचे प्रयत्न, भीती, लैंगिक सतावणूक आदी समस्यांचा त्यात समावेश आहे. या सर्व समस्यांवर मूल्याधिष्ठित शिक्षण व योगा उपाय ठरू शकेल. अन्य कोणताही त्यावर उपाय नसल्याचे पाटणेकर यांनी सांगितले. समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टळू शकल्या, असे सांगून कोणताही विद्यार्थी शिक्षणात मागे का असतो, याचे मूळ कारण शोधणे महत्वाचे असते, असे पाटणेकर यांनी सांगितले.