मूर्तीला ‘क्रॉस’ घातल्याने उगे गावात तणाव

0
99

>> सिध्देश्‍वर देवालयातील घटना; संशयित युवकाला त्वरित अटक

 

उगे – सांगे येथील श्री सिद्धेश्‍वर देवालयातील मूर्तीच्या गळ्यात ‘क्रॉसची माळा’ घालण्याचा निंदनीय प्रकार घडल्याने वातावरण तापले. ही घटना काल दुपारी दोन वाजल्यानंतर घडली. या प्रकरणी सांगे पोलिसांनी लुकास कार्व्हालो या युवकाला अटक केली असून त्याने कृत्य केल्याची कबुली दिली आहे. पोलीस कारवाईनंतर वातावरण निवळले आहे.

सदर देवस्थान शिवशंभोचे असून काल सोमवार असल्याने पुरोहित सकाळी अभिषेक, पूजा व दुपारी आरती करून दोन वाजता घरी गेला. त्यानंतर दोन ते साडेचारच्या दरम्यान श्री सिद्धेश्‍वर देवालयातील मूर्तीच्या गळ्यात अज्ञाताने क्रॉसची माळा घातल्याचा प्रकार देवळात दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या दृष्टीस पडला. त्यांनी ही घटना इतरांना सांगताच ती वार्‍यासारखी गावात पसरली. त्यानंतर गावातील भाविक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी या घटनेची माहिती सांगे पोलिसांना दिली.
वरील माहिती मिळताच स्थानकाचे नव्यानेच ताबा घेतलेले पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून गावकर्‍यांशी चर्चा केली. गावकर्‍यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी लुकास कार्व्हालो याला ताब्यात घेतले. सविस्तर चौकशी केल्यानंतर लुकासने सदर कृत्य आपण केल्याचे पोलिसांसमोर मान्य केले. फ्रान्सवर ऐतिहासिक मात करीत पोर्तुगालने युरो चषक पटकावल्याने आपण देवाच्या गळ्यात आनंदाच्या भरात माळा घातल्याचे लुकासने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे देवाचे पावित्र्य भंग झाल्यामुळे देवस्थान समिती व गावकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सदर कृत्य आपणच केल्याचे त्या युवकाने मान्य केल्यानंतर पोलिसांनी खात्री करण्यासाठी स्वान पथकाला पाचारण केले. त्यावेळी पोलीस प्रशिक्षित स्वानाने कबुली दिलेल्या युवकाला जबड्यात पकडले. यानंतर संतप्त झालेले ग्रामस्थ वरील कृत्य त्या युवकानेच केल्याचे सिद्ध झाल्याने शांत झाले. यावेळी जमलेल्या गावकर्‍यांनी सदर कृत्य लुकास यानेच केले की त्याला कुणी फूस लावून करायला भाग पाडले याची त्वरित चौकशी करण्याची मागणी केली आहे. देवस्थान समितीने त्वरित मूर्ती शुद्धीकरण करण्याचे ठरवले असून सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, शिवसेनेचे नेते बाबूराव नाईक, पंच अमेय नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.