-डॉ. आरती दिनकर(होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक)
मूत्रपिंडात मुत्रच तयार न झाल्यामुळे लघवी न होणे किंवा फार कमी होणे म्हणजेच अमुत्रता होय. तसेच मूत्रपिंडात तयार झालेले मूत्रपिंड नलिकेतील अवरोधामुळे खाली मूत्राशयात येऊ न शकणे व त्यामुळे लघवी न होणे किंवा कमी होणे यास मूत्रावरोध म्हणतात.
मागील भागात आपण वारंवार लघवी होणे किंवा अंथरुणात लघवी होणे याविषयी माहिती पाहिली आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार पाहिले. आज आपण अमुत्रता किंवा लघवी तुंबणे या विषयी पाहणार आहोत. लघवी तुंबणे हे लक्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेचदा झालेले आढळते. बरेचदा यामध्ये काही गंभीर कारण नसतानासुद्धा लघवी कमी झालेली आढळते. मूत्रपिंड रक्तातील काही प्रकारचे विष मूत्राद्वारे बाहेर काढीत असते. मूत्रपिंडामध्ये काही रोग झाल्यास (विशेषतः दोन्ही मूत्रपिंडात) त्याचे कार्य बरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे हे विष रक्तात साठून राहते. यामध्ये लघवी होत नाही किंवा खूप कमी होते.
यामध्ये दोन प्रकार आहेत. १) आशुकारी- म्हणजेच नुकताच उद्भवलेला
२) खूप जुनाट रोग.
- पहिल्या प्रकारामध्ये फिट्ससारखे लक्षणं एकाएकी येतात- डोके दुखणे, चक्कर किंवा मळमळ. ह्या लक्षणांनंतर फिटस् एकदाच येतात किंवा अनेक वेळा येतात. रुग्णाला फिटस् आल्यानंतर मूर्च्छा येते तर केव्हा केव्हा फिट्स ऐवजी मांस पेशींना झटके येतात व डोळ्यांपुढे अंधार येतो. यामध्ये बरेचदा रुग्णास तापही असतो तर काही वेळेस अंग थंड लागते.
- दुसर्या प्रकारामध्ये डोके दुखणे, चक्कर येणे, सुस्ती येणे ही लक्षणे असतात. सुस्ती वाढत जाऊन रोगी बेशुद्ध होऊ शकतो व बडबडू लागतो. श्वास घेण्यास त्रास होतो, चेहरा काळा निळा पडतो. मांसपेशींना झटके येतात. उलटी, जुलाब आणि उचक्या ही लक्षणे असतात. मूत्रपिंडात मूत्र उत्पन्न होत असूनही ते मूत्राशयात उतरत असताना त्याच्या प्रवाहास मूत्रपिंड नलिकेत अडकून असलेल्या खड्याने किंवा इतर कारणाने अडथळा होऊन लघवी बाहेर येण्यास कष्ट होतात. त्यामुळे हा रोग होतो.
- मूत्रपिंडात मुत्रच तयार न झाल्यामुळे लघवी न होणे किंवा फार कमी होणे म्हणजेच अमुत्रता होय. तसेच मूत्रपिंडात तयार झालेले मूत्रपिंड नलिकेतील अवरोधामुळे खाली मूत्राशयात येऊ न शकणे व त्यामुळे लघवी न होणे किंवा कमी होणे यास मूत्रावरोध म्हणतात.
मूत्रपिंडात जर खडे असतील तर त्यामुळे झालेल्या मूत्रावरोधाची लक्षणे थोडी वेगळी असतात. सुरुवातीस यातून पस सेल्स किंवा मूत्रक्षार लघवीतून येतात आणि लघवी करतेवेळी खूपदा असह्य वेदना होतात. लघवीतून बरेचदा रक्तही पडते. यामुळे पेशंटला अशक्त वाटते, झोप येत नाही. लहान मुलांमध्ये लघवी कमी किंवा अजिबात होत नाही. अशावेळी मूल खूप जोराने रडते. बेंबीच्या खाली मूत्राशयाच्या जागेत फुगीरपणा दिसतो. त्यामुळे मूल थोडेसे अस्वस्थ असते. अशावेळी त्या मुलाला फिटस्ही येतात. पोटात भयंकर दुखत असते, पोटात कळ येते, तेव्हा मुल दमून मुठी आवळते, थरथर कापते, चेहरा निळसर पडतो. क्वचित वेळेला लहान मुलांमध्येसुद्धा मुतखड्यामुळे पोटात दुखते व लघवीला कमी होते. अर्थात त्याची चिकित्सा करावी लागेल की मुलाला गॅस झाल्यामुळे की मूत्रशुळामुळे की यकृत शुळामुळे त्याला हे दुखत आहे हे कळेल. मुख्य म्हणजे भरपूर पाणी पिणे, तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ न खाणे चांगले. काही होमिओपॅथिक औषधे – आर्सेनिक अल्बम, एपिस मेल, टेरेबिंथ, कँथरीस, कॅम्फर, सिकेलकॉर जी होमिओपॅथ तज्ञाच्या सल्ल्यानेच घ्यावीत.