>> अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती
>> आंतरराज्य वाहतूक सेवेवरही परिणाम
राज्यात मागील चोवीस तासापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी पणजी जलमय झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे आंतरराज्य वाहतुकीचे तीनतेरा वाजले. रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे पारोडा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने कुडचडे-मडगाव येथील वाहतुकीवर परिणाम झाला. सत्तरीत तालुक्यातील नद्यांची पातळी वाढल्याने रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली होती. जोरदार वारा आणि पावसामुळे राज्यभरात पडझडीच्या घटना सुरूच असून जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.
राज्यात आत्तापर्यंत ४४.१३ इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात ४.२९ इंच पावसाची नोंद झाल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. कुळे परिसरात रेल मार्गावर माती आल्याने वास्कोहून दिल्लीला जाणार्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. वास्को-हुबळी या मार्गावरील रेल वाहतुकीवरही परिणाम झाला. कुळे – सावर्डे दरम्यान रेल्वे रुळावर पावसाच्या पाण्याने माती वाहून आल्याने कुळे – वास्को या मार्गावरील दोन प्रवासी रेलगाड्या रद्द करण्यात आल्या. तर वास्को – चेन्नई, वास्को – निझामुद्दीन आणि हुबळी निझामुद्दीन लिंक एक्सप्रेस सुमाने तीन तास उशिरा सोडण्यात आल्या.
आंतरराज्य वाहतूक कोलमडली
कारवारहून ८० किमीवर असलेल्या अंकोला तालुक्यातील रमणगुळी परिसरात दरड कोसळल्याने तब्बल १५ तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे गोवा – कर्नाटक दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम झाला. गोव्यात येणार्या प्रवासी बसेस सुमारे आठ तास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. गोव्याकडे येणारी तसेच मुंबईकडे जाणारी असंख्य वाहने या मार्गावर अडकून पडली होती. पहाटे ३ च्या दरम्यान ही दरड कोसळली. शेवटी दुपारी १२ वाजता मार्ग खुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत गोव्यात पोहोचणार्या प्रवासी बसेस दुपारी ३ वाजता मडगावला पोहोचल्या.
पारोडा रस्ता पाण्याखाली
कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे पारोडा येथे रस्त्यावर मीटरभर पाणी भरले होते. रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने कुडचडे – मडगाव वाहतूक विस्कळीत झाली. काल पहाटेच पारोडेचा रस्ता पाण्याखाली गेल्याने केपे – ते मडगावपर्यंत वाहतूक दुसर्या बाजूने वळविण्यात आली. मडगावहून कुडचडेच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली. हा रस्ता बंद झाल्याने शाळा, कॉलेजांत जाणार्या विद्यार्थ्यांचे तसेच नोकरदारांचे हाल झाले. रस्ता बंद झाल्याने मडगाव – सांगे मार्गावरील काही प्रवासी बसेस बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मडगाव शहरही जलमय
नावेली, खारेबांध, तळेबांध, पश्चिम बगल रस्त्यावर जुनाबाजार, आर्ले, आके तसेच रावणफोंड येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली. तळेबांध येथे झोपड्यांपर्यंत पाणी भरले होते. नावेली येथे दोन घरांवर झाडे पडल्याने १० हजारांची हानी झाली. सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मडगावातील स्टेशनरोड पाण्याखाली गेला होता.
गेल्या चोवीस तासात सांगे व केपे येथे प्रत्येकी ८ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, गुरूवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या नऊ तासांत पणजीत ३.२७ इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयामध्ये मागील चोवीस तासात ४४ आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे. तसेच ८ जुलै ते ९ जुलै या काळात ५५ आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे. जोरदार वार्यामुळे झाडे मोडून, उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. पणजी परिसरात दोन ठिकाणी झाडे मोडून पडल्याने पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यात एक कारगाडीचा समावेश आहे. राज्यभरातून आपत्कालीन घटनांच्या नोंदी होत आहेत.
मागील चोवीस तासात सांगे येथे सर्वाधिक ८.५८ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, केपे येथे ८.२६ इंच पावसाची नोंद झाली आहे. या दोन्ही तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले. मुरगाव येथे ४.६३ इंच, दाबोळी येथील ४,४७ इंच, मडगाव येथे ३.८५ इंच पावसाची नोंद झाली.
पणजी येथे ३.९२ इंच, फोंडा येथे ३.८९ इंच, म्हापसा येथे २.४८ इंच, पेडणे येथे १.०१ इंच, ओल्ड गोवा येथे ३.४८ इंच, साखळी येथे ३.४८ इंच, काणकोण येथे १.०९ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथील पावसाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.