मुळव्याधी आणि होमिओपॅथी

0
2732
  • डॉ. आरती दिनकर
    (होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक)

होमिओपॅथीची औषधे ऑपरेशन न करता, रोग्याला काही त्रास न होता व कायमचा गुण देणारी अशी अत्यंत प्रभावी औषधे आहेत. म्हणजेच मुळव्याधीचे मूळ होमिओपॅथीच्या औषधांनी समूळ नष्ट होऊ शकते.

एक ४७ वर्षीय विजय नावाचे गृहस्थ मूळव्याधीचा असह्य त्रास होत आहे. बसता- उठता येत नाही, शौचास साफ होत नाही, शौचातून रक्त पडते; रक्त अंदाजाने चार-पाच चमचे नक्कीच पडत असावे.. असे त्यांचे म्हणणे. गुदद्वारात वेदना ठेचल्याप्रमाणे किंवा कापल्याप्रमाणे असह्य वेदना होतात. तसेच एकदा त्यांचे मुळव्याधीचे ऑपरेशनही झालेले आहे पण परत काही दिवसांनी त्यांना मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. जागेवर मुळव्याधीचे कोम्ब आले. मी त्यांना काही प्रश्न विचारले- त्यांचा आहार, ते व्यायाम करतात का? पाणी किती पितात?.. एकूणच त्यांची दिनचर्या जाणून घेतली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की ह्या गृहस्थांचे स्वतःचे दुकान आहे. त्यामुळे दुकानात नुसते बसलेलेच असतात म्हणजे बैठे काम, व्यायाम नाही आणि त्यांना मसाल्याचे आणि मांसाहारी पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे असे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात येतात. दुकानात किंवा शेजारी वॉशरूम नसल्यामुळे सारखे -सारखे लघवीला जावे लागेल म्हणून पाणी कमीच पितो असे ते म्हणाले. पोटात गॅस होतात बरोबरीने असिडिटी ही असतेच, एकूणच या विजय पेशंटची जीवनशैली मुळव्याधीची रोगलक्षणे उद्भवण्यास अनुकूल होती.

मी त्यांना सध्या असलेल्या मूळव्याधीच्या रोग लक्षणांनुसार नेमके होमिओपॅथीचे औषध दिले. बरोबरीने त्यांना आहार काय घ्यावा, व्यायाम काय करावा हे सांगितले. अपेक्षेप्रमाणे त्यांना लवकरच गुण आला.

त्यांनी विचारलं, ‘मला परत मुळव्याध उद्भवू शकते का?’ मी सांगितले, ‘शक्यता खूपच कमी पण तुम्ही व्यायाम केलात, तिखट, मसाल्याचे, तेलकट पदार्थ कमी खाल्ले तर परत हा त्रास उद्भवणार नाही. मांसाहारही कमी प्रमाणात खाल्ला तर उत्तम!’
आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेक रोगांचे मूळ हे वेळी-अवेळी जेवण किंवा खाणे, पाणी कमी पिणे, भूक असतानाही काहीही न खाणे किंवा जंक फूड खाऊन, शीतपेये यांनी तात्पुरती भूक शमविणे आणि यामुळे पचनसंस्था बिघडणे हे बहुतेकांचे रुटीन झाले आहे. यामुळे काही रोग डोके वर काढतात आणि पेशंटला हैराण करतात. यातीलच एक रोग लक्षण म्हणजे ‘मुळव्याध’. मुळव्याधीने म्हणजेच ‘पाइल्स’ने ग्रस्त झालेले लोक खूप वैतागलेले असतात. त्यांना धड बसता येत नाही की उठता येत नाही. ‘अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य’ अशी काहीशी स्थिती होऊन जाते. कारण स्वतःला मुळव्याध आहे, त्याचा त्रास होतो असं आपण जवळच्या माणसांव्यतिरिक्त कुणाला सांगू शकत नाही. बरेचदा मुळव्याध बैठे काम करणार्‍या किंवा सतत बसून राहणार्‍या स्त्री-पुरुषांना झालेली दिसून येते. मुळव्याध फारच त्रासदायक असते. बसणे- उठणेसुद्धा त्यामुळे कठीण होते. रोगी वैतागतो. त्याला त्यामुळे झोपही येत नाही. परसाकडे झाले तरी आवयुक्त असते. कधी कधी रक्तही पडते. ठेचल्याप्रमाणे, कापल्याप्रमाणे, बोचल्याप्रमाणे किंवा टोचल्याप्रमाणे असह्य वेदना होतात. मुळव्याधीचे कोंब ३-७-११ या घड्याळात वाजण्याच्या स्थानाप्रमाणे असतात. कधी कधी जास्त हालचाल किंवा जास्त श्रमाने रक्तस्त्राव वाढतो. निलेमध्ये रक्तसंचय होऊन त्या विस्तृत व ठिसूळ होतात. प्रथम फुगतात व नंतर फुटून स्त्राव होतो.

स्त्रियांना मुळव्याधी गर्भाशयाच्या दाबापासून होते व पुरुषांमध्ये आतड्याची क्रिया बंद झाल्यामुळे होते. स्त्रियांमध्येसुद्धा गर्भाशयाच्या दाबाने केवळ मुळव्याध उत्पन्न होते असे नाही तर आतड्यांची क्रिया बंद झाल्यानेही मुळव्याध होते. स्त्रियांमध्ये कधीकधी गरोदरपणी गुदद्वाराच्या सभोवती मूळव्याधीचा झुपका जमतो तो पुढे कमी होत नाही जर त्यातून रक्त वाहिले तर कुणाकुणाला बरे वाटते. बरेचदा स्त्रियांना बाळंतपण झाल्यानंतर मुळव्याध झाल्याचे लक्षात येते पण मूळव्याधीची सुरवात स्त्रियांमध्ये पाचव्या- सहाव्या महिन्यात होऊ लागते. दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास मूळव्याधी वाढते. मूळव्याधी बहुतेकदा द्राक्षाच्या घडाप्रमाणे वाढलेली आढळून येते.

पुरुषांमध्ये नुसते बसून राहणे तसेच जड पदार्थ सेवन केल्यामुळे व ते न पचल्यामुळे मलबद्धता म्हणजेच रोज शौचास साफ न होणे, पोटात गॅस होणे यामुळे मुळव्याध झालेली दिसून येते. येथे अनेकदा बरेचसे पेशंट मुळव्याधीचे ऑपरेशन करून घेतात पण काही दिवसांनी परत त्याला मूळव्याधीचे कोंब दिसू लागतात. मूळव्याधीचा त्रास होऊ लागतो. अशा वेळी होमिओपॅथिक औषध दिले तर ते ठणठणीत बरे होतात, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा परत मुळव्याध उद्भवल्याचे दिसून येते… यासाठी होमिओपॅथीची औषधे ऑपरेशन न करता, रोग्याला काही त्रास न होता व कायमचा गुण देणारी अशी अत्यंत प्रभावी औषधे आहेत. म्हणजेच मुळव्याधीचे मूळ होमिओपॅथीच्या औषधांनी समूळ नष्ट होऊ शकते.