मुले कशी (बि)घडतात

0
2
  • रमेश सावईकर

मुलं लहान असतात म्हणून ‘ती बिघडत चालली आहेत’ असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यापेक्षा आपण सर्वजण कमी-अधिक प्रमाणात कसे बिघडत चाललो आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. थोडक्यात, मुलांना घडविण्यासाठी पालक, शिक्षक व समाज आदींनी सुजाण होऊन आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची नितांत गरज आहे.

मुलांचे संगोपन करून त्यांना सुसंस्कृत बनवणे आजच्या पालकांसमोर एक आव्हान बनले आहे. मुलं सांगितलेलं ऐकत नाहीत, हट्ट करतात, जरा मोठी झाली की आपल्या स्वतंत्र विश्वात वावरतात, आई-वडिलांचे ऐकत नाहीत, हे पालकांचे नेहमीचेच तुणतुणे ऐकायला मिळते. पण प्रश्न असा आहे की, हे असं का घडतं याच्या मुळाशी जाऊन आपण कधी विचार करतो का? दोषांचं खापर मुलांच्या माथ्यावर फोडून पालक मोकळे होतात, हे कितपत योग्य आहे? मुलं सुधारण्यासाठी समुपदेशनाची गरज आहे असं आपण म्हणतो, ते पूर्णार्थानं खरं आहे का?
आज पालक सुजाणपणे मुलांशी वागतात का? ते ‘पालक’ म्हणून आपली जबाबदारी ओळखून ती व्यवस्थितपणे पार पाडतात का? तेवढा सुजाणपणा त्यांच्यात आहे का? आणि असल्यास त्याचा प्रत्यक्ष अवलंब केला जातो का? हासुद्धा तेवढाच गंभीर विषय आहे. एकंदर विषयाची व्याप्ती आणि सभोवतालची परिस्थिती व पार्श्वभूमी यांचा विचार करता आज ‘सुजाण पालकत्वा’ची खरी गरज आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आजचे पालक म्हणजे मुलांचे आई-वडील आपल्या व्यापांत, कामात एवढे व्यस्त नि व्यग्र असतात की त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळच असत नाही; मग संस्कारांची गोष्ट बाजूलाच राहिली. जीवनाच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी आई-वडिलांना उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करावी लागते. मुलांना पाहण्यासाठी एखादी बाई घरात ठेवावी लागते. ती मुलांना पाहणार, त्यांच्याबरोबर खेळणार की घरातलं स्वयंपाकपाणी, कचरा काढणे, भांडी घासणे, धुणी धुणे आदी कामांचा व्याप सांभाळणार? सुजाण, सुशिक्षित कामवाली बाई मिळणे कठीण. त्यामुळे जी अशिक्षित, अडाणी बाई कामासाठी मिळते ती मुलांना खाऊ-जेवू देईल; पण मुलांना खेळवत असताना त्यांना चांगल्या-वाईट बाबींची जाणीव कशी काय करून देऊ शकणार?
मुलं लहान असतात त्यावेळी त्यांची मनं नाजूक असतात. अगदी कोरी पाटी. त्या पाटीवर मुळातच ओरखडे ओढले गेले तर कसं होणार? मुलं किमान पाच वर्षांची होईपर्यंत त्यांना आईवडिलांनी अधिकाधिक वेळ द्यायला हवा. त्यांच्यावर या वयात फक्त आईवडीलच मायेची पाखर घालू शकतात. प्राथमिक शिक्षण घेत असताना म्हणजे 5 ते 10 या वयोगटातील मुलांवरती घरी संस्कार करण्याची जबाबदारी आईवडिलांचीच असते. ती जबाबदारी त्यांनी पार पाडायलाच हवी.
नेहमी खरे बोलावे- खोटे कधी बोलू नये, कोणासही अपशब्द वापरू नये, मोठ्यांचा आदर ठेवावा, आपल्या सवंगड्यांबरोबर भांडू नये, त्यांच्याशी खेळीमेळीने वागावे आदी गोष्टी मुलांच्या मनावर बिंबविण्याचे काम आईवडिलांनी करायला हवे. प्राथमिक शाळेतील शिक्षक/शिक्षिकांना बऱ्याचदा ते शक्य होत नसते. एकशिक्षकी शाळा असेल तर एका शिक्षकाला पहिली ते चौथी असे चार वर्ग सांभाळावे लागतात. अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करणाऱ्या शिक्षकांना मुलांचे समुपदेशन करायला कुठून फुरसत मिळणार? त्यातही अगदी हाडाचा शिक्षक असेल तर तो मुलांवर संस्कार करण्यावर अधिक भर देईल. पण आधुनिक काळात असे क्वचितच आढळून येते.

शाळेतून घरी आल्यावर मुलांना तिन्हीसांजेच्या वेळी देवासमोर बसवून त्याला शुभम्‌‍ करोती, स्तोत्रे म्हणायला शिकवणे, नंतर त्यांना अभ्यासाला घेऊन बसणे, ही जबाबदारी आजचे पालक पार पाडतात का? कामावरून वडील थकून आल्यामुळे हातात मोबाईल घेऊन आपले स्वतःचे मनोरंजन करून घेतात. आई बिचारी कामावरून दमून-भागून आलेली असली तरी तिला घरकाम करावंच लागतं. त्यामुळे मुलांची चौकशी करायला तिच्याकडे फुरसत नसते. मात्र ही परिस्थिती बदलायलाच हवी. आपण आपल्या मुलांचे किती नुकसान करत आहोत, त्यांचे भवितव्य घडविण्याऐवजी ते बिघडवतच आहोत, याची जाण पालकांनी ठेवायला हवी. पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवला नाही तर त्यांनी कोणाकडे बघायचे?
मुलांना ज्यावेळी समज यायला लागते त्यावेळी हळूहळू पालक आपणाकडे हवे तेवढे लक्ष देत नाहीत ही बाब त्यांच्या ध्यानी येऊ लागते. त्यांना पूर्ण समज आल्यावर आपण आपल्याच घरी मायेला, आपुलकीला, प्रेमाला आणि जिव्हाळ्याला पारखे होत चाललोय हे कळते. आणि मग हीच मुलं स्वतःचं विश्व शोधतात आणि त्यात स्वतंत्रपणे वावरण्याकडे झुकतात. यात मुलांचा तरी काय दोष? मुलं ज्यावेळी टीन एजर (थर्टीन टू नाईन्टीन- तेरा ते एकोणीस) असतात, त्यावेळी त्यांना खूपच सांभाळायला हवं. मोठ्यासारखी बोलू लागली तर ती स्वतःलाच मोठी समजतात असा त्यांच्यावर ठपका ठेवला जातो, अजाण असल्यागत बोलली तर त्यांना बालिश म्हटलं जातं- अशी त्यांची मानसिक अवस्था असते. ताणतणावाच्या या मुलांच्या वयात त्यांना आईवडिलांनीच समजून घ्यायला हवं. तेसुद्धा कोणत्या पद्धतीनं तर दरारा व भीती दाखवून नव्हे तर त्यांचे मित्र बनून. त्यांच्या पूर्ण कलानं घेऊन त्यांना जाणून घ्यायला हवं. मुलांना वाटले पाहिजे की आपण आपले मन त्यांच्याकडे दिलखुलासपणे खुले करावे. पण असे घडणे फारच कठीण नि दुर्मीळ. त्याकरिता पालकांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करून, अधिक सुजाण बनून आपले प्रश्न हाताळायला हवेत.

मुलांसमोर त्यांचे शिक्षक हे आदर्श असतात. शिक्षक आपणाला जे सांगतात ते खरेच असते अशी विद्यार्थ्यांची सर्रास धारणा असते. पण कालमानानुसार ही परिस्थिती आता बरीच बदलली आहे. आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविणे हीसुद्धा एक नवी समस्या बनत चालली आहे. तसे पाहायला गेल्यास शिक्षण क्षेत्रात शिकविणे ही दुय्यम क्रिया; शिकणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. केवळ विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांनीही शिकायला हवे. आजचे विद्यार्थी बेशिस्त, उर्मट, उद्धट असतात असा त्यांच्यावर ठपका ठेवून शिक्षक मोकळे होतात. पण ते चुकीचे आहे. उत्तम शिक्षक कोणता? ‘ही इज दी बेस्ट टिचर वन हू कमस्‌‍ इन्स्टंटली डाऊन टू दी लेव्हल ऑफ दी स्टुडंट्स.’ शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पातळीवर येऊन त्यांना ज्ञान देणे गरजेचे आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना जाणून घ्यायला हवे. शिक्षक हा प्रथमतः ‘रिसोर्सफूल’ असायला हवा. त्याला विषयाचं अत्याधुनिक ज्ञान असायला हवं. आपण ज्या विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, त्याबद्दल ते अनभिज्ञ आहेत, त्यांत त्यांची गती नाही असा शिक्षकाचा समज असतो. पण तो गैरसमज होय. विद्यार्थ्यांमध्ये आकलनशक्ती असते, न जाणवणारी हुशारी असते, याचे भान शिक्षकांना असणे गरजेचे. शिक्षक-विद्यार्थी सुसंवाद घडण्यासाठी त्यांच्यामध्ये गुरू-शिष्याचे नव्हे तर मित्रत्वाचे नाते निर्माण व्हायला हवे, तरच विद्यार्थी शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतील, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतील आणि तेवढेच प्रेमही करतील.

आपण विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतो ते त्यांनी ग्रहण केलं का? हे समजून घेऊन ‘त्यांनी ते शिकलं’ याची खात्री शिक्षकांनी करून घ्यायला हवी. विद्यार्थ्यांकडूनही शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. त्या शिक्षकांनी शिकून घेतल्या, नुसार ते वागले तर आदर्श नव्हे तरी विद्यार्थी-प्रिय शिक्षक निश्चित बनू शकतील.
मुलांवर चांगले संस्कार होण्याची गरज आपण व्यक्त करतो. पण ही फक्त आईवडील, शिक्षक यांच्यापुरतीच जबाबदारी मर्यादित नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारीही आहे. आजची सामाजिक परिस्थिती एवढी खालावत चालली आहे की उद्याचे भावी नागरिक म्हटल्या जाणाऱ्या मुलांनी समाजाकडून नेमकं गाळून-गाळून म्हणजे तरी काय घ्यावं? मुलांना घडविणे हे एक आव्हान आहे. ती बिघडणं फार सोपं झालं आहे. मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना घडविण्यासाठी आधी समाजाच्या इतर बिघडत चाललेल्या घटकांनी योग्य ती जाण ठेवून सन्मार्गाने पुढे जात घडायला हवे, तरच त्यांच्यात मुलांच्या भावी पिढीला घडविण्याएवढे सामर्थ्य प्राप्त होऊ शकेल. स्वतःला शहाणे समजून दुसऱ्याला शिकविण्यापेक्षा आज प्रत्येकाने शिकण्याची नितांत गरज आहे. मुलं लहान असतात म्हणून ती बिघडत चालली आहेत असा ठपका फक्त त्यांच्यावर ठेवण्यापेक्षा आपण सर्वजण कमी-अधिक प्रमाणात कसे बिघडत चाललो आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, तरच परिस्थिती थोडीफार बदलण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही. थोडक्यात, मुलांना घडविण्यासाठी पालक, शिक्षक व समाज आदींनी सुजाण होऊन आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची नितांत गरज आहे.