मुलीसह पती व पत्नीची आत्महत्या

0
106

कुंभारजुव्यातील कुटुंबाची मुलाच्या निधनानंतर शोकांतिका
तळपवाडा-कुंभारजुवे (पुलाजवळ) येथील अशोक नाईक (४६), पत्नी नूतन (४०) व मुलगी दीपश्री (१३) यांनी राहत्या घरी साडीच्या आधारे गळफास लावून आत्महत्या केली. काल सोमवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांचे घरातील चहाचे दुकान (कॉफे नवदुर्गा) उघडले नसल्याने शेजार्‍यांच्या चौकशीअंती घरातील दुर्घटना उघडकीस आली. लगेच जुने गोवे पोलीस स्थानकाला सूचना दिली गेली.
आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी त्यांचा मानसिक अपंग मुलगा विशाल गेल्या २० दिवसामागे वारला होता. त्याच्या मानसिक तणावाखाली अशोक नाईकचे कुटुंब वावरत होते अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.
मुलगी दीपश्री माशेल येथील शारदा इंग्लिश हायस्कूलात ७ वीच्या वर्गात शिकत होती. अभ्यासात ती हुषार होती. भाऊ वारल्याने गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेला ती अनुपस्थित होती. शिवाय गेल्या २२ जुलैपासून ती विद्यालयात गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.
जुने गोवे पोलीस स्थानकाच्या अधिकार्‍यांनी चौकशीस सुरवात केली असून आई व मुलीने एका फॅनला तर वडील अशोक यांनी घरातील दुसर्‍या सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस तपास चालू असून कुंभारजुवे आमदार पांडुरंग मडकईकर तसेच स्थानिक सरपंच सुरेंद्र नाईक यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.