मुलांच्या लसीकरणासाठी १ जानेवारीपासून नोंदणी सुरू

0
18

>> कोविन ऍपवर करावी लागेल नोंदणी; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणार बुस्टर डोस

देशात येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्यासाठी १ जानेवारीपासून कोविन ऍपवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी काल दिली. काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसेल. त्यामुळे नोंदणीसाठी दहावीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले.
१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच आरोग्य सेवेतील आणि फ्रंटलाईन कर्मचार्‍यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्यात येणार आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले १ जानेवारीपासून कोविन ऍपवर लसीसाठी नोंदणी करू शकतील. मुले नोंदणी करण्यासाठी त्यांचे शाळेचे ओळखपत्र वापरू शकतात. किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, तर आरोग्य सेवा आणि फ्रंटलाईन कर्मचार्‍यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल.
१५ ते १८ वयोगटातील १० कोटी मुले
देशाच्या औषध नियंत्रकांनी १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी दिली आहे; पण सरकारने केवळ १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात १५-१८ वर्षे दरम्यान १० कोटी मुले आहेत. या मुलांना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. मुलांच्या लसीकरणाची मागणी देशात खूप दिवसांपासून केली जात आहे.

३० पेक्षा जास्त देशांमध्ये
मुलांचे लसीकरण

जगभरातील ३० हून अधिक देशातील मुलांना कोरोनाची लस देत आहेत. क्युबामध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे, तर दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्समध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे.

६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोससाठीची प्रक्रिया अगदी आधी सारखीच असेल. जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, दुसरा डोस आणि तुम्ही नोंदणी करत असलेल्या दिवसातील अंतर ९ महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही बूस्टर डोससाठी पात्र आहात. जेव्हा तुम्ही नोंदणी कराल, तेव्हा तुम्हाला काही व्याधी आहेत की नाही हे विचारले जाईल. तुम्ही होय म्हटल्यास तुमची नोंदणी होईल आणि लसीकरण केंद्रावर तुम्हाला नोंदणीकृत डॉक्टरांकडून व्याधीचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बूस्टर डोस मिळेल, असे डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले.

मुलांसाठी लस नोंदणी प्रक्रिया कशी करणार?
१ सर्वप्रथम लेुळप रिि वर जा. स्वत:चा मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
२ आता आधार कार्ड, युनिक डिसॅबिलिटी आयडी, शाळेचे ओळखपत्र किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
३ तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग, जन्मतारीख निवडा.
४ नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. त्यानंतर लसीकरण केंद्रांची यादी येईल.
५ आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
६ लसीकरण केंद्रावर, तुम्हाला संदर्भ आयडी आणि सिक्रेट कोड प्रदान करावा लागेल. जो तुम्हाला कोविन ऍपवर नोंदणी केल्यावर अगोदरच मिळालेला असेल.