- शशांक मो. गुळगुळे
पालकांनी जर लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केली तर पालकांचे फार मोठ्या प्रमाणावर कर-दायित्व कमी होऊ शकते. मुलाने/मुलीने 19 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर करदायित्वाशी पालकांचा संबंध उरत नाही. सर्व करदायित्व सज्ञान झालेल्या मुला/मुलीचे होते.
मुलाच्या किंवा मुलीच्या भविष्यासाठी/भवितव्यासाठी आई-वडील त्यांच्या नावे गुंतवणूक करतात. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी ही गुंतवणूक केली जाते. काहीजण तर मूल जन्मलेल्या दिवशीच मुला किंवा मुलीसाठी पहिली गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांपैकी जन्मदाखला 8 दिवसांत मिळू शकतो, तर जन्मलेल्या अर्भकाचे पॅन व आधार 45 दिवसांत तयार होते. 18 वर्षांनंतर व्यक्ती सज्ञान समजली जाते. त्यामुळे त्याहून कमी वयाच्या मुलाचे/मुलीचे बँकेत खाते उघडताना ते आईबरोबर किंवा वडिलांबरोबर संयुक्त उघडावे. आई, वडील व मूल असे तिघांच्या नावेही खाते उघडता येते. मुलांच्या नावे पीपीएफ (पब्लिक प्रोव्हिडंट फंड) खाते उघडले जाते. या खात्याची मुदत किमान 15 वर्षे असते. मुलींसाठी शासनाची सुकन्या समृद्धी योजना आहे. या खात्यात जमलेले पैसे खातेधारक मुलीला तिचे वय 21 हून अधिक झाल्यावर तिला मिळू शकतात. पीपीएफ व सुकन्या समृद्धी योजना या सरकारी योजना असल्यामुळे यांत जोखीम नाही. यातील गुंतवणूक सुरक्षित असते.
आईवडिलांना जर गुंतवणूक करायची असेल, अधूनमधून यात पैसे भरायचे असतील तरच लहान मुलाच्या नावे बचत खाते उघडावे. बहुतेक आईवडिलांची अशी मनोधारणा असते की, मुलाचे पैसे काढायचेच नाहीत. स्वतःचे पैसेच काढायचे. भारतीयांची अशी मनोधारणा असते की शक्यतो सोने विकायचे नाही. तीच मनोधारणा त्यांची मुलांच्या गुंतवणुकीबाबत असते. लहान मुलाच्या नावावर केलेली गुंतवणूक ते मूल 18 वर्षांचे झाल्यानंतर काढून घेतल्यास त्यावर कॅपिटल गेन कर भरावा लागतो. लहान मुलांच्या नावावर म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक किंवा बँकेच्या मुदत-ठेवीत केलेली गुंतवणूक ते मूल 18 वर्षांचे होण्य्ाापूर्वी काढून घेतली तर हा व्यवहार प्राप्तीकर पात्र असतो. प्राप्तिकर आई किंवा वडील यांना भरावा लागतो. जर लहान मूल स्वतः पैसे कमवीत असेल- उदाहरण द्यायचे तर टीव्हीवरील बऱ्याच मालिकांत लहान मुलं काम करतात- अशांना मिळालेले मानधन हे त्या लहान मुलाचे असल्यामुळे त्या बालकाला त्याचा आपल्या नावाने प्राप्तिकर भरावा लागतो. असे उत्पन्न कमविणाऱ्या मुलांचा स्वतंत्र प्राप्तिकर रिटर्न भरावा लागतो. लहान मुलांना वाढदिवसाला व अन्य काही कारणांसाठी नातलगांकडून रोख पैशाच्या स्वरूपात भेटी मिळतात. हे लहान मुलांना मिळालेले पैसे आपण खर्च करावेत असे आईवडिलांना वाटत नाही. म्हणून ते असे जमा होणारे पैसे गुंतवितात. बँकेच्या मुदत-ठेवीत केलेली गुंतवणूक करपात्र असते. लहान मुलांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करावी किंवा ‘एसआयपी’मध्ये (सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान) गुंतवणूक करावी. अन्य नातलगांपासून मिळालेल्या रोख रकमेतून 50 हजार रुपयांपर्यंतची ‘गिफ्ट’ करमुक्त असते. काही पालक मुलगी जन्माला आली तर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेतून मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत पैसे काढता येत नाहीत. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 50 टक्के रक्कम काढता येते व मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेची मुदतपूर्ती होते.
विमा व म्युच्युअल फंड कंपन्यांच्या लहान मुलांसाठी खास योजना आहेत व त्या फार लोकप्रियही आहेत. ‘युलिप’मध्येही (युनिट लिन्क्ड इन्शुरन्स प्लान) लहान मुलांसाठी बरेच पालक गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीत दीर्घ मुदतीत ‘मार्केट-लिन्क्ड’ परतावा मिळतो. विम्याचा टर्म इश्युरन्स प्लानही बरेच आईवडील आपल्या पाल्यासाठी निवडतात. शेअर बाजारात व्यवहार करायचे असतील तर लहान मुलाच्या/मुलीच्या नावे ‘डिमॅट’ खाते उघडावे लागते. पण आईवडिलांना शेअरबाजारात व्यवहार करून शेअर विकत घेता येत नाहीत. लहान मुलांसाठी त्यांच्या नावे ‘आयपीओ’त गुंतवणूक करता येते. गोल्ड बॉण्ड, इतर बॉण्ड्स किंवा कर्जरोख्यांत गुंतवणूक करता येते, तसेच गिफ्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करता येते.
लहान मुलाचे ट्रेडिंग खाते असू शकते, पण या खात्यातून लहान मूल स्टॉक ब्रोकरकडून शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. आईवडिलांनी केलेल्या गुंतवणुकीची पूर्ण मालकी मूल 19व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्याच्याकडे येते. सर्व पालकांना स्वतःच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आर्थिक तरतूद तसेच मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक या दोन्ही गोष्टी करणे शक्य नसते. अशांसाठी ते मूल जेव्हा उच्चशिक्षण घेण्यासाठी योग्य होईल तेव्हा शैक्षणिक कर्ज मिळू शकते.
लहान मुलांच्या नावे गुंतवणूक कशी करावी?
लहान मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी जन्मदाखला हवा. लहान मुलाच्या नावे बँक खाते उघडावे. या खात्यात अधूनमधून पैसे भरत राहावे. या बचत खात्यात बऱ्यापैकी रक्कम जमा झाल्यावर यातील रक्कम म्युच्युअल फंड किंवा अन्य उत्पादनांत गुंतवावी. लहान मुलांच्या डिमॅट खात्यात पालक शेअर ट्रान्स्फर करू शकतात. लहान मूल सज्ञान झाल्यावर पुन्हा ‘केवायसी’ची प्रक्रिया करावी लागते. लहान मुलांना आई-वडील, भाऊ-बहीण, आजोबा-आजी, काका-काकी, आते- आतेचे यजमान, मामा-मामी, मावशी व मावशीचे यजमान या नातलगांकडून मिळणाऱ्या ‘गिफ्ट’ करमुक्त असतात. तसेच या गिफ्ट देण्यामुळे, गिफ्ट देणाऱ्याचे करदायित्व काही प्रमाणात कमी होते. जर नातलगाने आयकर कायद्याच्या 56 (2) अन्वये गिफ्ट दिली असेल तर ती गिफ्ट करपात्र नाही. इतर नातलगांनी दिलेली रु. 50 हजार इतक्या रकमेपर्यंतची गिफ्ट एका आर्थिक वर्षात करपात्र नाही, करमुक्त आहे.
नातलगांनी गिफ्ट म्हणून बँकांची मुदत-ठेव प्रमाणपत्रे देऊ नयेत. यातील गुंतवणूक करपात्र असते. नातलगांनी शक्यतो लहान मुलाच्या खात्यात पैसे जमा करावेत किंवा लहान मुलाच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. मुलाच्या किंवा मुलीच्या नावे गुंतवणूक केल्यास पालकांना कमी कर भरावा लागतो. उदाहरण द्यायचे तर, जर सर्व गुंतवणूक पालकांच्या नावे आहे. पालकांचे निव्वळ करपात्र उत्पन्न रुपये 30 लाख आहे असे समजू. तर करदायित्व रुपये 7 लाख 41 हजार इतके असेल. जर लहान मुलाच्या नावे गुंतवणूक केली तर उदाहरणार्थ- पालकांचे निव्वळ करपात्र उत्पन्न 20 लाख रुपये समजूया. लहान बालकाचे निव्वळ करपात्र उत्पन्न 10 लाख रुपये समजूया. तर करदायित्व 5 लाख 46 हजार रुपये असेल. यातून 1 लाख 95 हजार रुपये कर वाचू शकतो. त्यामुळे पालकांनी जर लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केली तर पालकांचे फार मोठ्या प्रमाणावर कर-दायित्व कमी होऊ शकते. मुलाने/मुलीने 19 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर करदायित्वाशी पालकांचा संबंध उरत नाही. सर्व करदायित्व सज्ञान झालेल्या मुला/मुलीचे होते. 18 वर्षांपासून कमी म्हणजे ‘मायनर’ मुला/मुलीचे उत्पन्न (व्याजापोटी मिळालेले किंवा गुंतवणुकीतून बाहेर पडल्यामुळे मिळालेले) पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट होऊन त्याचा कर पालकांना भरावा लागतो. पूर्वी मुलीच्या लग्नासाठी ही तरतूद केली जायची. पण पालक आता मुलीच्या लग्नापेक्षा तिच्या शिक्षणाचा जास्त विचार करून त्यासाठी गुंतवणूक करतात.