भारताचा लांब पल्ल्याचा धावपटू मुरली गावित याने मागील वर्षी आशियाई ऍथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत मिळविलेले कांस्यपदक रौप्यपदकात रुपांतरित होऊ शकते.
द्वितीय स्थानावर राहिलेला बहारिनचा हसन चानी ऍथलेटिक बायोलॉजिकल पासपोर्ट (बीओपी) उल्लंघन प्रकरणी दोषी आढळला आहे. ट्रॅक अँड फिल्ड प्रकारांतील उत्तेजक विरोधी प्रकरणे हाताळणार्या ऍथलेटिक इंटग्रिटी युनिटच्या डिसिप्लिनरी ट्रिब्युनलने चानी याच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. १६ मार्चपासून बंदीचा कालावधी सुरू झाला आहे. चानी याचे ३ ऑगस्ट २०१७ ते १६ मार्च २०२० या कालावधीतील सर्व निकाल रद्द करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. या निर्णयाविरोधात केवळ स्तित्झर्लंडमधील क्रीडा लवादाकडे दाद मागता येणार असल्याचे ट्रिब्युनलने स्पष्ट केले आहे.
दोहा येथे मागील वर्षी झालेल्या आशियाई ऍथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत चानी याने १०,००० मीटर प्रकारात २८.३१.३० सेकंद अशी तर गावितने २८.३८.३४ सेकंद वेळ नोंदविली होती. या प्रकारात बहारिनच्याच दावित फिकाडू याने २८.२६.३० सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक जिंकले होेते. चानी याने २०१८ साली आशियाई क्रीडा स्पर्धेतही १०,००० मीटर प्रकारात सुवर्ण कमाई केली होती.