मुरगाव शेड समर्थक-विरोधक आमनेसामने

0
130

>> वातावरणात तणाव, शेड आज हटवणार?

‘मुरगावचा राजाची शेड’वरून शेड समर्थक तसेच आमदार मिलिंद नाईक समर्थक असे दोन गट काल रविवारी सडा येथील मुख्य नाक्यावर एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे याठिकाणी काही काळ वातावरण तंग झाले. मात्र मिलिंद नाईक समर्थक, भाजप मंडळ, भाजयुमो व महिला मोर्चाच्या कार्यकर्ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तेथून निघून गेल्यामुळे वातावरण शांत झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

सुमारे १५ वर्षापासून कार्यरत असलेल्या या शेडच्याबाबतीत यंदा प्रथमच वाद निर्माण झाला असून त्याला राजकीय स्वरूप आलेले आहे. आमदार मिलिंद नाईक यांनी या शेडमध्ये अनैतिक व्यवहार चालत असल्याचा ठपका ठेऊन या शेडमध्ये गणेशोत्सव काळात केलेली सजावट व मंडप काढून टाकावा असे मुरगाव पालिकेला कळविले होते. त्यानुसार पालिका मुख्याधिकार्‍यांनी त्या शेडची पाहणी करून कारवाईचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यानंतर काही दिवसांनी शेड व त्याखालील मंडपाविरुद्ध कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी सड्यावरील युवक तसेच शेड समर्थकांनी उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांकडे केली होती. त्यामुळे हा वाद विकोपाला पोहोचला असून त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आमदार मिलिंद नाईक विरुध्द मुरगावचा राजा समर्थक शीतयुद्ध सध्या चालू आहे.

दरम्यान, काल सकाळी भाजप मंडळ, भाजप युवा मोर्चा, भाजप महिला मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सडा जंक्शनवर एकवटून मुरगावच्या राजाच्या समर्थकांनी आमदार मिलिंद नाईक यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले. तसेच यापुढे आमदार मिलिंद नाईक यांच्यावर असले आरोप केल्यास भाजपा मंडळ, युवा मोर्चा, महिला मोर्चा खपवून घेणार नाही असा निर्वाणीचा इशारा मुरगाव भाजप मंडळाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी याठिकाणी भाजप तसेच आमदार नाईक यांच्या समर्थकांसमक्ष घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, काल सकाळी भाजप कार्यकर्ते जंक्शनवर एकवटणार याची चाहुल लागताच मुरगावचे पोलीस निरीक्षक श्री. वस्त हे पोलीस ताफ्यासह कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपस्थित होते. मात्र पत्रकार परिषद आटोपताच भाजप कार्यकर्ते तेथून निघून गेले. तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेडच्या समर्थकांनी यावेळी शांत राहणेच पसंत केले.

दरम्यान, याविषयी माजी नगराध्यक्ष तसेच मुरगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वेसर्वा शेखर खडपकर यांना विचारले असता त्यांनी, या शेडमध्ये जर अनैतिक व्यवहार चालत नसतील तर ती सजावट व मंडप शासकीय अधिकार्‍यांमार्फत हटविण्यापेक्षा स्वत:हून काढणे सोयीस्कर ठरेल असे मत व्यक्त केले.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने या शेडखालील सजावट हटविण्याचे आदेश दिल्याने आज सोमवारी पोलीस बंदोबस्तात यावर कारवाई करण्याचे ठरविले असल्याने त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.