गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मुरगाव बंदरातील साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेडच्या (एसडब्लूपीएल) कोळसा हाताळणीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. याच कंपनीचा कोळशाच्या बदल्यात खनिज हाताळणी करण्यास मान्यता देण्याची मागणी करणारा अर्जसुद्धा नाकारण्यात आला आहे.
जिंदाल स्टील वर्कच्या (जेएसडब्लू) एसडब्लूपीएलने उच्च दर्जाचे खनिज आयात करण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती. खनिज आयातीसाठी आवश्यक पर्यावरण दाखला नसल्याने अर्जाला मान्यता देण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच एमपीटीच्या डॉल्फिन प्रकल्पाला मान्यता देण्यास नकार देण्यात आला आहे. एमपीटीने डॉल्फिन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर विचार विनिमय करण्यात आल्यानंतर तो नाकारण्यात आला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने काकोडा – कुडचडे येथे नव्याने उभारण्यात येणार्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला मान्यता दिली आहे. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता देण्यात आली आहे. साळगाव येथील विस्तारीत प्रकल्पात प्रतिदिन २५० टन कचर्यावर प्रक्रिया करण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रदूषण मंडळाकडे उपलब्ध असलेला खाणीवरील प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांच्या माहितीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ मार्चपर्यंत खाणी सुरू असताना मंडळाच्या प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्या खाणीची बँक हमी जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.