प्रदूषणनियंत्रण मंडळाने केली कारवाई
मुरगांव नगरपालिकेच्या मालकीच्या हेडलॅण्ड सडा येथील कचरा प्रकल्पाकडे दुर्लक्ष करून पर्यावरणाला धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने काल मुरगांव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जगन्नाथ भिंगी यांच्या विरोधात वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. येत्या १३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याविषयी निवाडा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार मंडळाने केल्याचे कळते.हेडलॅण्ड-सडा येथील प्रभाग- १ मधील एमपीटी कॉलनी परिसरात मुरगांव नगरपालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प असून, गेल्या काही वर्षापासून या प्रकल्पात कचर्यावर प्रक्रिया करण्याचे काम ठप्प झाल्याने प्रकल्पात कचर्याचे ढीग पडून आहेत. क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने हा कचरा या प्रकल्पात पडून असून त्यामुळे पर्यावरणाला बाधा पोचली आहे. या साठलेल्या कचर्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधीही पसरलेली आहे. या प्रकल्पाशेजारीच एमपीटीचे इस्पितळ आणि निवासी गाळे असून, त्यांनाही या कचर्यामुळे त्रास होत आहे. सड्यावरील कचरा प्रकल्पामूळे पसरणार्या दुर्गंधी आणि पर्यावरणाला होणार्या धोक्याबद्दल वारंवार तक्रारी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादापर्यंत गेल्याने सड्यावरील पालिका कचरा प्रक्रिया प्रकल्पावर काय तो तोडगा काढा यासाठी गेल्या १५ दिवसांत दोनवेळा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली होती. जिल्हाधिकार्यांनी विनाविलंब पावले उचला अन्यथा परीणाम भोगा असा इशारा पालिका मुख्याधिकारी श्री. भिंगी यांना दिला होता. तरीही कोणतीच पावले उचलत नसल्याने अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्री. भिंगी विरोधात वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मंडळाचे सदस्य सचिव लेविनसन मार्टीन्स यांनी ही तक्रार केली आहे.