कोरोनामुळे काल रविवार दि. १२ रोजी मडगावच्या कोविड इस्पितळात दाबोळी चिखली येथील ८० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे मुरगाव तालुक्यातील कोरोनामुळे बळींची संख्या ८ झाली आहे. तर गोव्यात १४ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे.
मडगाव इस्पितळात दाबोळी चिखली येथील त्या वृद्धेला पंधरा दिवसांपूर्वी ताप येत होता. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्वांना मडगाव इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील सदर वृद्धा वगळता इतर जण बरे होऊन घरीपरतले तर तिला इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते. तिचे काल रविवारी दुपारी निधन झाले. दरम्यान, वास्को खारीवाडा सायबिण भाट, नॉनमून भाग मुरगाव उपजिल्हाधिकार्यांनी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
काणकोणात पहिला बळी
मणिपाल इस्पितळातून कोरोनाबाधित म्हणून मडगावच्या कोविड इस्पितळात उपचरासाठी पाठविलेल्या पाळोळे काणकोण येथील एका रूग्णाचे काल रविवारी १२ रोजी निधन झाले. काणकोण तालुक्यातील ती पहिली व्यक्ती ठरली आहे. ही व्यक्ती मणिपाल इस्पितळात उपचार घेत होती. या तालुक्यातून आतापर्यंत २० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील १० जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. अन्य व्यक्तींचा अहवालदेखील निगेटिव्ह आलेला आहे.