मुरगावमधील ३ पंचायतींसह बीडीओ कार्यालयाची झाडाझडती

0
111
वास्को बीडीओ कार्यालयात झडती घेताना पोलीस पथक.

बीडीओंच्या निलंबनानंतर दक्षता खात्याची कारवाई
गोव्याच्या ऍडव्होकेट जनरलना (एजी) खटल्याचे पैसे द्यायचे आहेत अशी अधिकृत पत्रे मुरगांव तालुक्यातील तीन पंचायतीना पाठवून प्रत्येकी २५ हजार रुपये उकळलेल्या मुरगावच्या निलंबीत गट विकास अधिकार्‍यांच्या आणखी कारनाम्यांची चौकशी करण्याच्या हेतूने काल राज्याच्या दक्षता विभागाने मुरगाव तालुक्यातील सांकवाळ, माजोर्डा व चिखली पंचायत आणि मुरगांव बीडीओ कार्यालयाची एकाचवेळी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.ऍडव्होकेट जनरलच्या नावाने पैसे उकळणार्‍या गट विकास अधिकारी मोहिनी हळर्णकर यांना मंगळवारी (दि. २१) सायंकाळी उशिरा सेवेतून निलंबित केल्यानंतर दक्षता विभागाच्या आदेशानुसार कालपासून (ता. २२) सांकवाळ, माजोर्डा, चिखली पंचायत आणि बीडीओ कार्यालयाबाहेर पोलीसांचा पहारा ठेवण्यात आला होता. दरम्यान, दिवाळी सुट्टीनंतर काल नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता सर्व कार्यालयातील कर्मचारी आपापल्या कार्यालयात आले असता, त्यांना कार्यालय उघडण्यास पहार्‍यावरील पोलीसांनी हरकत घेतल्याने ताटकळत बाहेर उभे रहावे लागले. झडती सत्र सर्व प्रथम चिखली कार्यालयातून सुरुवात केली असता सकाळी सव्वा अकरा वाजता चिखली कार्यालय पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत खोलण्यात आले. तर बीडीओ कार्यालय पावणे बाराच्या सुमारास उघडले व दक्षता विभागाच्या अधिकार्‍यांनी सर्व कार्यालयात दस्तऐवजांची पडताळणी केली. वेर्णा पोलीस निरीक्षक उदय परब, वास्को पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर, मुरगांव पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, दक्षता विभागाचे अधिकारी अणि इतर पोलीसांनी सांकवाळ, माजोर्डा व चिखली आणि बिडीओ कार्यालयातील अनेक दस्तऐवजांची पडताळणी केली.
हळर्णकरांनी पाठवलेली पत्रे ताब्यात
या पडताळणी दरम्यान सौ. हळर्णकर यांनी एजींच्या कार्यालयाच्या नावाने पंचायतींना पाठविलेली पत्रेही पोलीसांनी ताब्यात घेतली. तसेच ज्या संगणकावरून हे पत्र बनविण्यात आले त्याची हार्ड डिस्कही पोलीसांनी जप्त केली व अन्य काही कागदपत्रेही पोलीसांनी सर्व कार्यालयांतून जप्त केली आहेत. चिखली पंचायतीचे सचिव सिध्देश फळदेसाई यांनी निलंबित बिडीओकडून झालेला पत्रव्यवहार तसेच कार्यालयात येऊन पाने फाडलेली नोंदवही तपास अधिकार्‍यांना दिली. तसेच रोख २५ हजार रु. सौ. हळर्णकर यांच्या स्वाधीन बीडीओ कार्यालयात जमा केल्याची पोच पावतीही श्री. फळदेसाई यांनी तपास अधिकार्‍यांच्या स्वाधीन केली. तपासणी दरम्यान चिखलीच्या सरपंच वेरोनिका आंद्राद, उपसरपंच, हेमंत फडते, पंच क्लेटो डिसोझा, मेरी मास्कारेन्हास कार्यालयाबाहेर होते.
दरम्यान, वास्को बिडीओ कार्यालयात वास्को पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी दुपारी पावणेबारा वाजता झडती सत्र सुरु केले. तोपर्यंत या कार्यालयात सर्व कर्मचारी सकाळपासून कार्यालयाबाहेर उभे होते. दुपारी उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी चालू होती. दरम्यान उशीरा मिळालेल्या माहितीनुसार बीडीओ कार्यालयातील इनवर्ड व आऊटवर्ड रजिस्ट्रर गायब झाल्याचे पोलीस सूत्रांकडुन सांगण्यात आले.