राम सेनेचे नेते प्रमोद मुतालिक हे कर्नाटकातील हुबळीत राहत असताना विनाकारण त्याच्या नावाने गोव्यात आवाज उठवून लोकांमध्ये फूट पाडण्याचा व लोकांना भडकावण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले.
अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी ‘आतंकवादी गोंयात नाका’ या त्रियात्राचे लेखक व दिग्दर्शक तौसिफ यांना काही अज्ञात व्यक्तींकडून धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार गप्प असल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले असल्याचे सभागृहाच्या नजरेस आणून दिले असता पर्रीकर यांनी वरील स्पष्टीकरण केले.
मुतालिक कर्नाटकात राहतात. तेथे सरकार कॉंग्रेसचे आहे. ते त्यांना अटक करून कोठडीत का डांबत नाहीत. मुतालिक कर्नाटकात राहत असताना त्यांच्या नावाने गोव्यात का गोंधळ माजवला जातो. ते गोव्यात आले तर त्यांना आम्ही अटक करू, असे पर्रीकर म्हणाले. मात्र, त्यांच्या नावाने कुणी येथे विनाकारण गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नये असे ते म्हणाले.
तियात्राविषयी बोलताना ते म्हणाले की, कधी कधी तियात्राच्या नावाखाली अतिरेक केला जातो. ते टाळणे गरजेचे असून तियात्र अकादमीकडे चर्चा करून तियात्रिस्तानी स्वतःवर आवश्यक ती बंधने घालून घ्यावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.