>> शारापोव्हा, कर्बरचे आव्हान संपुष्टात
गतविजेत्या गार्बिन मुगुरुझा आणि जागतिक अग्रमानांकित रुमानियनाची सिमोना हालेप यांच्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्य लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुगुरुझाने अन्य एक गतविजेत्या रशियन सेंसेशन मारिया शारापोव्हाचा तर हालेपने जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या पहिला उपांत्यपूर्व सामना दोन माजी फ्रेंच ओपन जेत्यांमध्ये झाला. त्यात गार्बिन मुगुरुझाने मारिया शारापोव्हावर ६ -२, ६-१ असा सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय मिळविला. शारापोव्हा सुरुवातीपासूनच काहीशी निराश दिसून आली. त्याचा फायदा उठवित प्रारंभीपासून खेळावर वर्चस्व राखत गेल्या चार प्रयत्नात मुगुरुझाने पहिल्यांदाच शारापोव्हावर विजय मिळविला. आता गतविजेत्या मुगुरुझाची गाठ जागतिक नंबर १ महिला खेळाडू सिमोना हालेप हिच्याशी पडणार आहे.
काल झालेल्या दुसर्या उपांत्यपूर्व लढतीत हालेपने जर्मनीच्या अँजेलिक कर्बरवर मात करीत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविले आहे. तिने कर्बरचे आव्हान ६-७ (२), ६-३, ६-२ असे मोडित काढले. पहिला सेट गमावल्यानंतर हालेपने दमदार पुनरामन करताना कर्बरवर वर्चस्व मिळवित उपांत्य फेरीतील आपला प्रवेेश निश्चित केला.
मी जेव्हा तिच्याविरुद्ध खेळते तेव्हा नेहमीच कठीण सामना असतो. पहिल्या सेट नंतर मी स्थिर झालेे आणि मी पराभव स्वीकारला नाही, असे हालेपने सामना संपल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले. सुरुवातीला मी बर्याच चुका केल्या. परंतु त्यानंतर मात्र मी माझ्या खेळात काही बदल केले आणि त्यात यशस्वी झाले असे ती म्हणाली.