>> तिसर्यांदा विजयी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष; कडवी लढत अपेक्षित
गोवा विधानसभेच्या २०२२ च्या निवडणुकीतील नऊ उमेदवार हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातील किती जण हॅट्ट्रिक करण्यात यशस्वी होतात हे गुरुवारी होणार्या विधानसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावरील उमेदवारांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा समावेश आहे. तसेच कॉंग्रेसचे मायकल लोबो, कार्लूस आल्मेदा, भाजपचे नीलेश काब्राल, ग्लेन टिकलो, माविन गुदिन्हो, जेनिफर मोन्सेरात, रोहन खंवटे आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत हे २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत साखळी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले. आता, २०२२ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत निवडणूक रिंगणात आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि कॉंग्रेसचे धर्मेश सगलानी यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
कळंगुटमधील कॉंग्रेसचे उमेदवार मायकल लोबो हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. २०१२ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर मायकल लोबो पहिल्यांदा विजयी झाले. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर पुन्हा निवडून आले होते.
हळदोणा मतदारसंघातून भाजपचे ग्लेन टिकलो, कुडचडे मतदारसंघातून नीलेश काब्राल, दाबोळी मतदारसंघातून माविन गुदिन्हो हे मागील दोन निवडणुकीत निवडून आले होते.
वास्कोतील कॉंग्रेसचे उमेदवार कार्लूस आल्मेदा हेही मागील दोन निवडणुकीत निवडून आले, त्यावेळी आल्मेदा यांनी भाजपच्या उमेदवारीवरून निवडणूक लढविली होती.
पर्वरीतील भाजपचे उमेदवार रोहन खंवटे हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. यापूर्वी ते २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत खंवटे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.
ताळगाव मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार जेनिफर मोन्सेरात हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या होत्या.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई २०१२ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते, तर २०१७ च्या निवडणुकीत गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर विजयी झाले होते.
२६ पैकी महिला किती निवडून येणार?
यंदाच्या गोवा विधानसभा निवडणुकीत २६ महिला निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील किती महिला निवडून येतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या निवडणुकीत केवळ २ महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यात एलिना साल्ढाणा आणि जेनिफर मोन्सेरात यांचा समावेश होता. या दोघी पुन्हा एकदा यंदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २६ महिला निवडणूक रिंगणात आहेत. तृणमूल कॉँग्रेसने सर्वाधिक ४ महिलांना उमेदवारी दिली आहे. सत्ताधारी भाजपने तीन महिलांना, कॉंग्रेसने २, आम आदमी पक्षाने ३, शिवसनेने २, आरजीपीने २ आणि मगोने १ महिलेला उमेदवारी दिली आहे.