>> खाण उद्योग, नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीवर चर्चा
>> मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या चर्चेविषयी गुप्तता
गोवा विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनंतर राज्य मंत्रिमंडळाची फेररचना होणार असून, या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्याशी राज्यातील खाण उद्योग, तसेच नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी यासह अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. याशिवाय कालच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. दरम्यान, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही दिल्लीला प्रयाण केले असून, ते अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे.
चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ घातलेल्या गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांनी स्पष्ट केलेले असले, तरी यासंबंधी केंद्रीय नेत्यांशी चालू असलेल्या चर्चेच्याबाबतीत मात्र राज्य सरकार तसेच भाजप कलामीची गुप्तता बाळगत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिल्ली दौरा केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मंत्रिमंडळ फेररचनेच्या प्रश्नावरून सध्या विद्यमान मंत्र्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. मंत्रिमंडळातील वजनदार व क्रियाशील मंत्र्यांना या फेररचनेची चिंता वाटत नसली, तरी जे मंत्री वजनदार नाहीत आणि ज्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशा मंत्र्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. या एकूण वातावरणामुळे भाजपमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती आहे.
मंत्र्यांच्या कामगिरीचे रिपार्ट कार्ड आम्ही पक्षाचे राज्य प्रभारी बी. एल. संतोष यांच्याकडे पाठवले आहे व आता तेच पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील काय तो निर्णय घेतील, असे दामू नाईक यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. दरम्यान, दामू नाईक हेही अमित शहा यांची भेट घेणार असून, त्याशिवाय ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी देखील चर्चा
मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यात रेल्वे सेवेच्या विस्तारीकरणासंबंधी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी पेडणे ते काणकोण या मार्गावर जलद रेल्वे सुरू करण्यासाठी, तसेच मये येथे रेल्वे स्थानकाचा विकास करण्याबाबतही चर्चा केली. याशिवाय सार्वजनिक व खासगी सहभागाने (पीपीपी) मडगाात रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवण्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रेल्वे सेवेशी संबंधित साधनसुविधा वाढवण्याविषयीही त्यांच्याशी चर्चा केली.