मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट

0
19

>> खनिज वाहतूक, वाळू उत्खननासह विविध प्रश्नांवर मागितले सहकार्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन गोव्यातील प्रमुख प्रश्न त्यांच्यासमोर मांडून सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. राज्यातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, किनारी व्यवस्थापन आराखडा, खाण, रेती उत्खन्नन आदी विषय मांडले. मोपा लिंक रस्त्याच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल भेट घेतली. तसेच, केंद्रीय कृषी, ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचीही भेट घेतली.
नवी दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची काल भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

विकसित भारत 2047 च्या महत्वाकांक्षी व्हिजनअंतर्गत विकसित गोवा निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि समर्थन मागितले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ – मोप ते राष्ट्रीय महामार्ग 66 ला जोडणाऱ्या 6 लेन लिंक रोडचे उद्घाटन करण्यासाठी आणि एमईएस कॉलेज जंक्शन ते बोगमळो जंक्शनपर्यंत 4 लेन कनेक्टिव्हिटी रोडच्या पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. केंद्रीय मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अश्विनी वैष्णव यांच्याशी इफ्फीसंदर्भात चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. आगामी 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 च्या आयोजनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

भुपेंद्र यादव यांच्याशी राज्यातील विविध विषयांवर बोलणी
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी गोव्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी राज्याशी संबंधित अनेक विषयावर चर्चा केली. त्यात ईएसए अधिसूचना, वाळू उत्खनन, खाण वाहतूक आणि गोव्यासाठी किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या महत्त्वाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.