मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावा : गावकर

0
257

सांगे येथे ज्या ठिकाणी आयआयटी प्रकल्प होऊ घातला होता त्या जमीन प्रकरणी ‘सेटिंग’ करून ती पैसे उकळू पाहत होतो, असा जो आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे तो आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान काल सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी मुख्यमंत्र्यांंना दिले. त्याचबरोबर सरकारी जमिनीत कोण कसे काय ‘सेटिंग’ करू शकता असा प्रश्‍नही गावकर यांनी केला.

राज्यात मनोहर पर्रीकर यांचे सरकार सत्तेवर असताना आपण सांगे मतदारसंघात तात्कालीन सरकारला आयआयटीसाठी तीन ठिकाणी जमीन दाखवली होती. याप्रकरणी जर आपण ‘सेटिंग’ केले होते असे जर प्रमोद सावंत यांना वाटत असेल तर त्यांनी आपणाविरूद्ध चौकशी सुरू करावी. आपण कोणत्याही चौकशीला सामोरा जाण्यास तयार असल्याचे गावकर यांनी सांगितले.
आयआयटीसाठी आपण मनोहर पर्रीकर यांना कोटार्ली, रिवण व उगें अशा तीन ठिकाणी जमीन दाखवली होती. त्यापैकी रिवण येथील सर्व जमीन ही सरकारची म्हणजेच वनखात्याची होती. ती सर्व जमीन पडिक असून तेथे लोकवस्तीही नसल्याने आयआयटीसाठी ती जमीन सर्व दृष्टीने योग्य अशीच होती, असा खुलासाही गावकर यांनी केला.

मुख्यमंत्र्यांबरोबरच भाजप प्रवक्ते दामू नाईक व रमेश तवडकर यांनी आपणावर केलेल्या आरोपांचा गावकर यांनी पत्रकार परिषदतून समाचार घेतला.