पर्वरीतील प्रस्तावित सहापदरी उड्डाणपुलाचा (फ्लायओव्हर) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेरआढावा घेतल्यानंतरच या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकेल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल सांगितले.
या प्रकल्पाच्या कामासाठीची सज्जता, तसेच प्रकल्पाच्या शक्याशक्यतेचा अभ्यास, तसेच पर्यायी रस्त्यांची व्यवस्था या सगळ्या बाबींचा मुख्यमंत्र्यांना फेरआढावा घ्यावा लागेल. हे काम पूर्ण केल्याशिवाय ह्या प्रकल्पाचे काम सुरू करणे शक्य नसल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. या उड्डाणपुलाच्या नकाशाची मागणी देखील आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उड्डाणपुलाच्या बांधणीच्या पार्श्वभूमीवर पर्यायी रस्ते बांधण्यासाठीची प्रक्रियाही आम्ही हाती घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वरील सगळ्या गोष्टी मार्गी लावाव्या लागणार आहे. 5.2 किलोमीटर एवढ्या लांबीच्या या उड्डाणपुलासाठी 500 कोटी रुपये एवढा खर्च येणार असल्याचे रोहन खंवटे म्हणाले.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्यासाठी पोलिसांनी वर्दळीच्या पर्वरी मार्गावर वाहने अडवून वाहतूक कोंडीत भर घालू नये, अशी सूचनाही वाहतूक पोलिसांना केली आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.