>> माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपाने विरोधक एकवटले
>> सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा ः सुदिन
गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सत्ताधारी पक्षावर कोविड काळात गोव्यात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कॉंग्रेस, आप, तृणमूल कॉंग्रेस तसेच मगोप या विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत राजीनाम्याची मागणी केली. तृणमूल कॉंग्रेसने या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर मगोपने सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना पणजीत निदर्शन केली.
राज्य प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार चालू असून गोव्याचे माजी राज्यपाल व मेघालयाचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचारामुळे प्रमोद सावंत सरकार पूर्णपणे उघडे पडले आहे. राज्यपालांनी हे सरकार आता बरखास्त करून गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काल मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
आपण वेळोवेळी विधानसभेत ह्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला असल्याचे सांगून ढवळीकर म्हणाले की भाऊसाहेब बांदोडकर यांनी जो साखर कारखाना गोव्यात सुरू केला होता त्या साखर कारखान्याच्या जमिनीचा घोटाळा विद्यमान सरकारने केला आहे. धारबांदोडा येथे जे फॉरेन्सिक विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे त्या विद्यापीठाला २ लाख चौ. मी. एवढी जमीन देताना सोसायटीला विश्वासात घेण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. ह्या विद्यापीठाला २ लाख चौ. मीटर जमीन दिली आहे की चार लाख हे सरकारने स्पष्ट करावे असे सांगताना २ लाख चौ. मी. दिली असल्याचे सरकार सांगत असले तरी त्यासंबंधी जी अधिसूचना काढण्यात आली आहे तीत ४ लाख चौ. मीटर जमीन देण्यात आली असल्याचा उल्लेख असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
साधनसुविधा विकास
महामंडळात भ्रष्टाचार
गोवा साधनसुविधा विकास महामंडळात प्रचंड भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या कामांवर अर्थखात्यानेही ताशेरे ओढले असल्याचे ढवळीकर यांनी नजरेत आणून दिले. काल अकादमीच्या वास्तूच्या नुतनीकरणाचा अंदाज खर्च जो २५ कोटींवर होता तो ४५ कोटींवर नेण्यात आला आहे. डिचोली येथील बसस्थानक तसेच बाणस्तारी येथील बाजार प्रकल्पातही मोठा भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप ढवळीकर यांनी केला.
भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करा : तृणमूल कॉंग्रेस
तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फोलेरो, माजी केंद्रीय मंत्री व तृणमूलचे नेते बाबुल सुप्रियो, तृणमूलचे खासदार सुगाता रॉय यांच्या नेतृत्वाखाली काल तृणमूल पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी गोवा सरकारच्या कोविड व्यवस्थापनात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाप्रकरणी श्वेतपत्रिका काढावी. तसेच ह्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली.
माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी नेत्यांनी राज्यपालांकडे केली.
दरम्यान, तृणमूल कॉंगे्रस पक्षाच्या गोव्यातील विविध भागात लावलेल्या पोस्टर्स व होर्डिंग्जची मोडतोड करण्यात आली आहे त्याचा काल फोलेरो यांनी पत्रकारांशी बोलताना निषेध केला. त्याचबरोबर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
आम आदमी पक्षाची पणजीत निदर्शने
गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावल्यानंतर प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पक्षाने भाजप सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी अनेक आप कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करून अटक करण्यात आल्याचा आरोप आप नेत्यांनी केला.
आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी, गोव्यातील भाजपने राज्य चालवण्याची नैतिकता गमावली आहे. राज्यातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही रॅली काढली असल्याचे सांगितले. आपचे कार्यकर्ते शांततापूर्ण रितीने निदर्शने करत असताना पोलिसांनी आंदोलकांना रोखत लाठीहल्ला केला. ही बेकायदा कारवाई पोलिसांनी केली. मात्र पोलिसांच्या गैरवापराला आम्ही घाबरणार नाही असा इशारा यावेळी म्हांबरे यांनी दिला.
आम आदमी पक्षाने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या १० अपयशांवर प्रकाश टाकला असल्याचे यावेळी आपचे नेते अमित पालेकर यांनी सांगितले.
अनेक गोवेकरांनी कोविडमुळे मित्र, शेजारी आणि नातेवाईक गमावले मात्र भाजप सरकारला त्याची पर्वा नव्हती. गोमंतकीयांचा मृत्यू होत असताना भाजप नेते भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आपच्या गोवा उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. यावेळी सुमारे ३०० आपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते असे सूत्रांनी सांगितले.