मुख्यमंत्र्यांच्या आकस्मिक भेटीने कर्मचाऱ्यांची धावपळ

0
8

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाटो-पणजी येथील श्रमशक्ती भवनातील गोवा कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याच्या मुख्य कार्यालयाला काल आकस्मिक भेट दिल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी आमदारांनी विविध सरकारी कार्यालयातील कामकाजाबद्दल तक्रारी केल्या होत्या. सरकारी कर्मचारी कामकाजाबाबत उदासीन असल्याची टीकाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर, आता अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारी खात्यांना आकस्मिक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास खात्याला आकस्मिक भेट देऊन कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांना कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सूचना केली. तसेच, कौशल्य विकासाला गती देण्यासाठी आवश्यक बदलांबद्दल अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सरकारी कामकाजाला बळकटी देण्यासाठी आणि लोकांना चांगली सेवा देण्यासाठी सरकारच्या विविध विभागांच्या कार्यालयांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर दिली.