येथील कदंब बस स्थानकावर 6 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बस स्थानकाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार दिगंबर कामत, माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार उल्हास तुयेकर, माजी आमदार दामू नाईक व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सभेच्या स्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, काल फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी अधिकाऱ्यांसमवेत कदंबा बसस्थानक, रस्त्याचे रूंदीकरण व तात्पुरत्या कदंबा बस स्थानकाची पहाणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत रॅली व सभेमुळे बस स्थानकाची सुधारणा झाली. सध्या कदंबा बसस्थानक हलविण्यात आला आहे. हॉकी मैदान मातीचा भराव टाकल्याने सुसज्ज झाले. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मातीचे ढिगारे मैदानावर टाकल्याने जमीन सपाट झाली. त्याचा फातोर्डा मतदारसंघाला फायदा झाला असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. रस्ता रूंदीकरणामुळे अंबाजी व इतर ठिकाणी वाहतुकीची वर्दळ वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. काही दगडी कुंपणे मोडली आहेत. मतदारांनी तक्रार केली होती. ती बांधण्याची हमी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यामुळे फातोर्ड्याचा विकास झाला का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता आमदार सरदेसाई म्हणाले की, फातोर्डा मतदारसंघात पायाभूत सुविधा आहेत. तशा सुविधा मडगावला नाहीत. मडगाव शहरात नियोजनहीन इमारतींचे जाळे असल्याने सुरक्षित जागा फातोर्ड्याची आहे असे सरदेसाई यांनी सांगितले. कदंबा बस स्थानक म्हणजे पंचतारांकित हॉटेल नव्हे व तसे ते बनविण्याची गरज नाही. सर्व सुविधांयुक्त असा बस स्थानक असावा असे आपले मत आहे. आपण त्याबाबत सरकारशी बोललो आहे. आधी जो आराखडा बनवला होता त्यासाठी सल्लागारांनी पैसे कमावले. पण येथे काहीच उभे राहिले नाही, असे सरदेसाई म्हणाले.