मुख्यमंत्र्यांकडून वीज दरवाढीचे पूर्णपणे समर्थन

0
15

>> सर्वसामान्यांच्या घरगुती वीज बिलात सरासरी 8 ते 10 रुपये एवढीच वाढ होणार; युनिटमागे 6 ते 9 पैसे वाढणार

गोवा सरकारने संयुक्त वीज नियामक मंडळाच्या (जेईआरसी) शिफारशीनुसार जी वीजदरवाढ केलेली आहे, ती अत्यंत जुजबी अशी असून, या दरवाढीमुळे विजेचे बिल हे प्रती युनिट 6 ते 9 पैसे एवढेच वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती वीज बिलात सरासरी 8 ते 10 रुपये एवढीच वाढ होणार असल्याचा दावा करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल या वीज दरवाढीचे समर्थन केले. पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवार दि. 21 जून रोजी होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनी त्यांना नव्या वीजदरवाढीविषयी छेडले असता, त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

केंद्र सरकारकडून राज्याला लवकरच 2500 कोटी रुपये एवढे वीज अनुदान मिळणार असून, जर आम्ही संयुक्त वीज नियामक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार वीज दरवाढ केली नाही, तर गोवा सरकारला केंद्र सरकारकडून मिळणार असलेल्या ह्या 2500 कोटी रुपयांच्या वीज अनुदानाला मुकावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्हीच जर वीज ग्राहकांना दरवाढ माफ करुन अनुदान देता तर मग आम्ही तुम्हाला वीज अनुदान का म्हणून द्यावे, अशी भूमिका केंद्र सरकार घेईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वीज दरवाढप्रश्नी विरोधक नाहक टीका करीत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

भूमिगत वीजवाहिन्यांवर भर
राज्यातील लोकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी गोवा सरकारने भूमिगत वीजवाहिन्या घातल्या. अन्य राज्यांनी मात्र उद्योगधंद्याना चांगला वीजपुरवठा व्हावा, यासाठी त्यांना भूमिगत वीजवाहिन्या घालून दिल्या. परिणामी अजूनही त्या त्या राज्यांतील लोकांना अखंडित वीजपुरवठा देण्यात या राज्यांना अपयश आले आहे. अन्य राज्यांत भारनियमनही केले जाते. गोव्यात आम्ही तसे करुन जनतेला त्रास दिला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

‘तमनार’ प्रकल्पाचे ऑक्टोबरमध्ये उद्घाटन
‘तमनार’ प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आले असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

वीज साधनसुविधांवर
2 हजार कोटी रुपये खर्च

गोवा सरकारने राज्यातील वीज साधनसुविधा वाढवण्यावर, तसेच दुरुस्तीवर तब्बल 2 हजार कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. आता वीज साधनसुविधांवर आणखी 3 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.