राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे या घडीला राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याला प्राधान्य असल्याची माहिती काल बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना दिली. खाणी सुरू होण्यास अजून थोडा विलंब होऊ शकतो. त्यामुळे यापूर्वीच ज्या खनिजाचे उत्खनन झालेले आहे त्याची तसेच डम्पची विक्री सुरू करू दिली जावी यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलेला आहे. न्यायालयाने त्याला मान्यता दिल्यास या डम्पचा लिलाव करता येईल, असे लोबो म्हणाले. एकदा खाणी सुरू झाल्या की मग सरकार मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंबाबत निर्णय घेणार असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.
सध्या मांडवी नदीत सहा कॅसिनो असून त्यांना टप्प्याटप्प्याने पणजी शहराच्या विरुद्ध बाजूने हलवण्याचा प्रस्ताव आहे. पण हा कायमचा उपाय नसून काही वर्षांनंतर या कॅसिनोंना पाण्यातून जमिनीवर हलवण्यात येणार असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले. पण ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान सात वर्षांचा काळ लागेल. या कॅसिनो कंपन्या राज्यात पंचतारांकित हॉटेल्स उभारून हॉटेलात आपले कॅसिनो सुरू करतील. हे झाले की मांडवी नदीत एकही तरंगता कॅसिनो शिल्लक राहणार नसल्याचे लोबो म्हणाले.