मुख्यमंत्री – मंत्र्यांची आज दिल्लीत बैठक

0
68

पणजी (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार असून या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वीज मंत्री नीलेश काब्राल, महसूल मंत्री रोहन खंवटे हे नवी दिल्ली दाखल झाले आहेत. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आज सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्री पर्रीकर भाजपच्या निवडक पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटपाचा विषयावर मंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच प्रशासकीय कारभार गतिमान करण्याबाबत सूचना केल्या जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राज्यातील अनुपस्थितीमध्ये भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या नेत्यांमध्येच विविध विषयावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्र्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवू नये म्हणून मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांकडून छुपे डाव खेळले जात आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ज्येष्ठ मंत्री ढवळीकर यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यास गोवा ङ्गॉरवर्ड पक्षाने हरकत घेतलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून कुठला निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.