मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आज महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार

0
3

144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होऊन शाही स्नान करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, आमदार तसेच भाजपचे काही प्रमुख पदाधिकारी व राज्य प्रशासनातील काही अधिकारी आज (शनिवार, दि. 15) सकाळी 8 वाजता एका विशेष विमानाने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रयागराज येथे जाण्यासाठी प्रयाण करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही महाकुंभ मेळ्यासाठी जाणार आहे.

या मेळ्याला जाण्यासाठी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका विशेष विमानाची सोय करण्यात आलेली असून, तेथून सकाळी 8 वाजता हे विमान प्रयागराज येथे जाण्यासाठी उड्डाण करणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली जाणाऱ्या या चमूत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, भाजपमधील प्रमुख पदाधिकारी, आमदार तसेच राज्य प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. आपला दिल्ली दौरा करुन नुकतेच परतलेले गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना आपण महाकुंभमेळामध्ये सहभागी होण्यासाठी या चमुबरोबरजाणार असल्याचे स्पष्ट केले. गोवा सरकारने मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवरच हा दौर निश्चित केला होता. आणि त्यासाठी विशेष चार्टर प्लेनही बुक केले होते. मात्र, त्या दिवशी प्रचंड गर्दी होणार असल्याने उत्तर प्रदेश सरकारने गोवा सरकारला आपली यात्रा पुढे ढकलण्याची सूचना केली होती. या चमूत मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांसह अन्य मंत्र्यांचे कुटुंबीयही सहभाग होणार आहेत.