महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पराभूत होणार असून आपणास त्यात भागीदार व्हायचे नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र कॉंग्रेस सोडणार नसल्याचे ते म्हणाले. काल दुपारी राणे यांनी आपला राजीनामा सादर केला.
२००५मध्ये शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा सहा महिन्यांत मुख्यमंत्री बनवतो असे सांगण्यात आले मात्र गेली नऊ वर्षे कॉंग्रेस नेतृत्वाने आपले वचन पाळले नाही, असेही राणे यांनी नमूद केले. इतकेच नाही तर आपल्यासोबत कॉंग्रेसमध्ये आलेल्या एकालाही आमदार बनविण्यात आले नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
चव्हाण यांच्यावर टीका करत ऑक्टोबरमध्ये होणार्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी नेतृत्वबदलाची मागणी राणे करीत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण हे निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे व त्यांचे प्रशासनावर कोणतेच नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप राणे यांनी, राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे लोकांची कामे रखडून पडली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपणास राजीनामा देऊ नये असे सांगितले पण आपण त्यास नकार दिला, असे राणे म्हणाले.