मुख्यमंत्री दिल्लीत; मंत्री अस्वस्थ

0
10

आपल्या घरच्या दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन होताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीएसटी मंडळाच्या बैठकीसाठी दिल्ली गाठली. गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळाची फेररचना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली भेटीमुळे राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मंत्रिमंडळातील एक-दोन मंत्र्यांना डच्चू देऊन त्या जागी भाजपच्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात येणार असल्याने काही मंत्र्यांत अस्वस्थता पसरली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

चतुर्थीनंतर मुख्यमंत्री दिल्लीला जाणार हे निश्चित होते. त्यानुसार रविवारी मुख्यमंत्र्यांच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर त्यांनी काल सोमवारी जीएसटी मंडळाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाऊन बैठकीत भाग घेतला.

या भेटीत मुख्यमंत्र्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष तसेच काही केंद्रिय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीत मुख्यमंत्री राज्यातील मंत्रिमंडळ फेररचनेबाबत चर्चा करणार आहेत. त्यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची क्षमता व कार्यक्षमता याविषयी चर्चा होऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्य मंत्रिमंडळातील ज्या एक-दोघा मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे, त्या मंत्र्यांच्या तसेच त्यांच्या जागी ज्या नव्या आमदारांची मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे त्या सर्वांच्याच नावाविषयी सरकारने कमालीची गुप्तता बाळगली असली तरी सभापती रमेश तवडकर यांची मंत्रिपदी निवड निश्चित मानली जाते आहे. काही दिवसांपूर्वी डच्चू दिलेले बांधकाममंत्री नीलेश काब्राल हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून प्रयत्नरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीतील नुवे मतदारसंघाचे आमदार व मंत्री आलेक्स सिक्वेरा हे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आपल्या मतदारसंघातील मते भाजपला मिळवून देण्यास सपशेल अपयशी ठरल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात येऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र कधी काँग्रेस तर कधी भाजप करत असलेल्या मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याबाबत मंत्रिमंडळ फेररचनेबाबत भाजप कोणता निर्णय घेणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.