मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्लीत घेतली खाणमंत्री रेड्डी यांची भेट

0
8

नवी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी जी यांची नवी दिल्ली येथे काल भेट घेतली.
राज्यातील खनिज खाणी जलद गतीने सुरू करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल केंद्रीय कोळसा व खाण मंत्री रेड्डी यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती. भाजप गोवा यांच्याकडून भाजप मुख्यालय उभारण्यात येणार आहे. या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभाचे निमंत्रण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना देण्यात आले आहे.

दिगंबर कामत यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

सासष्टीतील विविध प्रकल्पांवर चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच वीजमंत्री सुदिन ढवळीकर व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे दिल्लीत असतानाच काल मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दिल्लीत राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत दिगंबर कामत यांनी गडकरी यांच्याशी कोंब येथील उड्डाण पूल, मडगाव येथील रिंग रोड व अन्य काही प्रमुख प्रकल्पांविषयी चर्चा केली. त्यासंबंधीची माहिती कामत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे दिल्लीत असतानाच एकाच वेळी सुदिन ढवळीकर, माविन गुदिन्हा हे मंत्री व आमदार दिगंबर कामत हे दिल्लीला गेल्याने राज्यमंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार आहे की काय याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. सभापती रमेश तवडकर हेही नुकतेच दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन परतले आहेत.
लोकसभा निवडणुकानंतर राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याची चर्चा निडणुकांपूर्वी ऐकू येत होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, सभापती, मंत्री व आमदार दिगंबर कामत यांचे दिल्ली दौरे सुरू झाले आहेत.