>> मंत्रिमंडळ समावेशाबाबत अजूनही अस्पष्टता
राज्याच्या मुख्यमंत्री पदी डॉ. प्रमोद सावंत यांची निवड निश्चित झालेली असली, तरी त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश केला जाणार, याबाबत अजून काहीच स्पष्टता नाही. केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्रिमंडळात समाविष्ट होणार्या आमदारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे स्थानिक भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.
सोमवार दि. २८ मार्चला डॉ. सावंत यांचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात होणार आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपर्यंत मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपमध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. मंत्रिपद न मिळणार्यांना सभापती, उपसभापतीपद आणि वजनदान महामंडळे दिली जाणार आहेत. विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो याचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित आहे.
फोंड्यात पहिल्यांदाच कमळ फुलविणार्या रवी नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आमदार रोहन खंवटे, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, रमेश तवडकर, बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हर्ळणकर, सुभाष फळदेसाई हेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मगोपने विना अट पाठिंबा दिल्याने सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.