मुख्यमंत्री-कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांत रंगले वाक्‌युद्ध

0
22

>> चोडणकर म्हणतात, १० मिनिटांत सरकार घडवणार

>> डॉ. सावंत म्हणतात, ५ आमदार तरी निवडून आणून दाखवा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सध्या जोर चढला आहे. भाजप, कॉंग्रेस, आप, तृणमूल, मगोसह सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांमध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी निवडणूक निकालानंतर १० मिनिटांत सरकार घडवण्याचा दावा केला आहे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार स्थापणे सोडाच; ५ आमदार तरी निवडून आणून दाखवा, असे आव्हान कॉंग्रेसला दिले आहे.

या निवडणुकीत भाजपला विजयी करण्याची जबाबदारी डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आहे, तर कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा गिरीश चोडणकर सांभाळत असून, दोन्ही नेते राज्यभरात विविध ठिकाणी प्रचारांमध्ये गुंतले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुद्धा होत असून, त्याला प्रत्युत्तर देखील जात आहे.

गिरीश चोडणकर हे कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी पेडण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रचार सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधला.

गोवा विधानसभेच्या येत्या १४ फेब्रुवारीला होणार्‍या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला २४ ते २६ जागा मिळतील, असा विश्‍वास चोडणकर यांनी व्यक्त केला. तसेच निवडणूक निकालानंतर केवळ ५ मिनिटांत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्‍चित करून पुढील १० मिनिटांत राजभवनावर जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

राज्यभरात कॉंग्रेसच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॉँग्रेसने जनतेचा विश्वासघात करणार्‍यांना उमेदवारी दिलेली नाही. ८० टक्के नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत २४ ते २६ जागा कॉंग्रेसला मिळतील, असेही ते म्हणाले.

चोडणकर यांच्या दाव्याचा
मुख्यमंत्र्यांकडून समाचार

गिरीश चोडणकर यांनी हा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. साळगावात जयेश साळगावकर यांच्या प्रचारानंतर काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर ५ मिनिटांत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्‍चित करून पुढील १० मिनिटांत सरकार स्थापनेचा दावा करण्याचे दिवास्वप्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पाहत आहेत; मात्र ते शक्य नाही. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचे ५ उमेदवार सुद्धा निवडून येणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

आगामी निवडणुकीत भाजपला २२ मध्ये २२ जागा मिळतील, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसच्या कार्यकाळात राज्य विकासापासून वंचित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून गोव्यात अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आलेली आहेत. भाजपच्या उमेदवारांना मतदारांकडून भरघोस पाठिंबा लाभत आहे, असा दावाही डॉ. सावंत यांनी केला.