मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर करणार्‍या व्यक्तीविरुद्ध कारवाई

0
94

>> वाहतूक नियमभंग प्रकरण

वाहतूक नियमभंग प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर केल्या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गंभीर दखल घेत काल कारवाईचा आदेश पोलीस महासंचालकांना दिल्यानंतर सतीश ताम्हणकर (शिवोली) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. वरील व्यक्तीने वाहतूक नियम भंगप्रकरणी पोलीस कारवाई टाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर केला होता. या घटनेचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

वाहतूक पोलिसाने वाहतूक नियमभंग प्रकरणी एका वाहन चालकाला अडविला होते. वाहन चालकाला वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी दंड भरण्याची सूचना करण्यात आली. मात्र, वाहन चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास प्रारंभ केला. मुख्यमंत्री कार्यालयात आपली ओळख असल्याचा दावा करून दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला. तसेच दंडात्मक कारवाई करणार्‍या पोलिसांवर पंधरा दिवसांत कारवाई करण्याची धमकीही दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वाहतूक नियम भंग प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी काही जणांकडून मंत्री, आमदार यांचे वशिले लावून वाहतूक पोलिसांवर दबाव आणला जातो. आता मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर होऊ लागल्याने चौकशी करून योग्य कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा, बेशिस्त वाहतूक, पुलावर लेन कटींग, सिटबॅल्ट न वापरणे आदी वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी वाहन चालकांवर कारवाई केल्यास दंडाची रक्कम भरावी. पोलिसाशी हुज्जत किंवा कारवाई टाळण्यासाठी वशिलेबाजी करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.